देवरुखजवळील मुरादपूर गावात सुमारे ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या खैराच्या झाडांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी जमीन मालक बळीराम सीताराम चौगले यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे या चोरीप्रकरणी त्यांनी आपल्या चुलत भावावर संशय व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी नऊच्या सुमारास बळीराम चौगले यांना त्यांच्या मालकीच्या (सर्वे नं. ८२/९) जमिनीतून झाडे तोडण्याचा आवाज ऐकू आला. यावेळी पुतण्यासह ते घटनास्थळी गेले असता, तेथे दहा कामगार खैराची झाडे तोडताना दिसले. चौकशी केली असता, परशुराम चौगले यांनी झाडे तोडण्यास सांगितले असल्याचे कामगारांनी सांगितले.
झाडतोड थांबवण्याची सूचना केल्यानंतर परशुराम चौगले यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यावेळी संबंधित जागा आपलीच असल्याचा दावा करत, “जागा माझी असल्यास मी झाडे तोडणारच,” असे म्हणत, जागा दुसऱ्याची सिद्ध झाल्यास झाडांची दुप्पट किंमत देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हा वाद त्याच दिवशी पोलीस ठाण्यात नेण्यात आला. जागेची मोजणी करून मालकी निश्चित झाल्यानंतर झाडांबाबत निर्णय घेण्याचे तेथे ठरले होते.
त्यानंतर १६ जानेवारी रोजी बळीराम चौगले यांनी भूमी अभिलेख कार्यालय, देवरुख येथे जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज केला. मात्र, अर्ज प्रलंबित असतानाच २० जानेवारी रोजी ते पुन्हा संबंधित जमिनीत गेले असता, तोडलेली सर्व २० खैराची झाडे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकारामुळे धक्क्यात सापडलेल्या बळीराम चौगले यांनी देवरुख पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम ३०२(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, संबंधित जमिनीच्या मालकीवरून दोन्ही चुलत भावांमध्ये वाद असून त्याबाबत दावा प्रलंबित आहे. एवढ्या मोठ्या किमतीची झाडे चोरीला गेल्याने मुरादपूर परिसरात खळबळ उडाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













