संगमेश्वर: सोनवी नदीत पोहण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा बुडून मृत्यू

banner 468x60

कोल्हापूरहून आलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला असून, सोनवी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका ३७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजित शंकर बोरगे (रा. राजारामपुरी, शाहूनगर, १३ वी गल्ली, कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित बोरगे हे आपल्या मावस भावासह व काही मित्रांसोबत कोल्हापूरहून टाटा सुमो (एमएच १०-२२७०) या वाहनाने संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे मित्राच्या आजोळी फिरण्यासाठी आले होते. रविवारी (५ एप्रिल) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास हे सर्व मित्र लोवले येथील सोनवी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले.


दरम्यान, पोहत असताना अजित बोरगे यांचा पाण्याचा अंदाज चुकल्याने ते अचानक खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. ही बाब लक्षात येताच त्यांच्या सोबत असलेल्या मित्रांनी तत्काळ त्यांचा शोध घेतला व काही वेळात त्यांना पाण्याबाहेर काढण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांना तातडीने संगमेश्वर येथील एका खासगी धन्वंतरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अजित बोरगे यांना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, आनंदाने सहलीसाठी आलेल्या मित्रपरिवारावर या घटनेमुळे शोककळा पसरली असून, कोल्हापूर शहरातही या घटनेची बातमी समजताच हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना नदी, धरण किंवा इतर जलस्रोतांमध्ये पोहताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *