रत्नागिरी : भगवती किल्ला परिसरात बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

banner 468x60

रत्नागिरी शहराजवळील भगवती किल्ला परिसरात तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह समुद्रकिनारी आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमोल संजय किड्ये (वय ३०, रा. मांडवी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव असून, गुरुवारी (ता. ९) सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल किड्ये हा काही दिवसांपूर्वी आपल्या राहत्या घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. गेल्या तीन दिवसांपासून तो बेपत्ता असल्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी भगवती किल्ल्याजवळील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्रकिनारी काही नागरिकांना रेलिंगच्या बाहेरील बाजूस समुद्रात एक मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेतली.
समुद्राच्या खडकाळ भागात मृतदेह अडकलेल्या अवस्थेत असल्याने तो बाहेर काढणे अवघड ठरत होते. अखेर स्थानिकांच्या मदतीने रोपवेच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. ओळख पटविल्यानंतर हा मृतदेह अमोल किड्ये याचाच असल्याचे निष्पन्न झाले.


विशेष म्हणजे, घटनास्थळाजवळच अमोलची दुचाकी गाडी उभी आढळून आली असून, गाडीला चावीही तशीच लावलेली होती. त्यामुळे या प्रकरणात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. हा अपघात आहे की आत्महत्या अथवा अन्य काही घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे मांडवी परिसरात शोककळा पसरली आहे.


शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *