चिपळूण तालुक्यातील शिवाजीनगर–खेर्डी येथील एका प्रौढाचा सह्याद्री पर्वतरांगांमधील भैरवगड येथे फिरण्यासाठी गेले असताना अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे घाडे कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनय दीनानाथ घाडे (वय ४४, रा. शिवाजीनगर–खेर्डी, ता. चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत प्रकाश बुद्धिवंत पाथरुड यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
विनय घाडे हे आपल्या काही मित्रांसह २१ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता सह्याद्रीच्या खोऱ्यातील प्रसिद्ध भैरवगड येथे फिरण्यासाठी गेले होते. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतल्यानंतर सर्व मित्रांनी रात्री तेथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २२ डिसेंबर रोजी सकाळी भैरवगडावरील मंदिरासमोर ते उन्हात उभे असताना विनय घाडे यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या.
वेदना वाढत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणीअंती विनय घाडे यांना मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेची नोंद सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, आनंदाच्या सहलीचे रूपांतर अचानक दुःखद घटनेत झाल्याने मित्रपरिवारावर शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













