दापोली : विद्यार्थ्यांना दिवाळीची खास भेट – सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे पालगड शाळेत शालेय साहित्य वाटप

banner 468x60

सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने शुक्रवार, 17 ऑक्टोबर रोजी दापोली तालुक्यातील पूज्य साने गुरुजींच्या जन्मगाव असलेल्या पालगड येथील पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या 203 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे कीट वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत हा क्षण त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने एक दिवाळीची खास भेट ठरली.


कार्यक्रमास सेवा सहयोग फाउंडेशनच्या प्रतिनिधी मनाली राकेश तलाठी, साने गुरुजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. अशोक नारायण करंदीकर, संचालक विश्वनाथ तांबडे, मुख्याध्यापक प्रसाद पावशे, शाळेतील शिक्षकवर्ग, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. डॉ. करंदीकर यांनी सौ. मनाली तलाठी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मुख्याध्यापक प्रसाद पावशे यांनी सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


मनाली तलाठी यांनी सेवा सहयोग फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देताना, किशोरी मंच व इतर सामाजिक कार्यांचा परिचय करून दिला.
विश्वनाथ तांबडे यांनी सेवा सहयोगचे कार्य “समाजासाठी प्रेरणादायी व उपयुक्त” असल्याचे मत व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. करंदीकर यांनी, “सेवा सहयोगचे योगदान शाळा व संस्थेसाठी नेहमीच ऋण मानले जाईल,” असे नमूद करत आभार व्यक्त केले.


शालेय साहित्याच्या वाटपानंतर विद्यार्थ्यांमध्ये खास उत्साह दिसून आला. यावेळी शाळेच्या प्रांगणात एकत्र येत समूह छायाचित्र काढण्यात आले.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तप्रसाद गुरव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री पावशे यांनी सेवा सहयोग फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले. “या किटमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *