शृंगारतळी : अय्यंगार बेकरीतून पेढा खाल्ल्याने 11 महिलांना विषबाधा

banner 468x60

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे न्यु बैंगलोर अय्यंगार बेकरीमधून आणलेले पेढे खाल्ल्याने ‘वेदांत ज्वेलरी’मध्ये काम करणाऱ्या ११ महिलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या महिलांना तात्काळ शृंगारतळी येथील प्रो लाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

श्रावण महिना असल्याने एका महिलेने सकाळी सुमारे ११ वाजता शृंगारतळी येथील अय्यंगार बेकरीतून पेढे आणले. ते प्रसाद म्हणून सर्व महिलांना वाटले गेले. प्रत्येक महिलेने अर्धा पेढा खाल्ल्यानंतर काही वेळातच त्यांना चक्कर आणि उलटी होण्याचा त्रास सुरू झाला. या महिलांना त्वरित प्रो लाईट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलांना उपचारानंतर घरी सोडलं आहे.

banner 728x90


या घटनेत विषबाधा झालेल्या महिलांमध्ये स्वप्नाली पवार, प्रतीक्षा मोहिते, पूजा मोहिते, वृषाली पवार, विदिशा कदम, सोनाली नाईक, मधुरा घाणेकर, निकिता गमरे, प्रिया मोहिते, संजना गिरी आणि मानसी शिगवण यांचा समावेश आहे. या सर्व महिला तळवली, मळण, पालपेणे येथील रहिवासी आहेत.


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व महिलांची प्रकृती सध्या चांगली असून त्या धोक्याबाहेर आहेत. या घटनेची माहिती मिळताच चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वाडकर यांनी भेट देऊन पाहणी केली, तर गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.


शृंगारतळी परिसरात अनेक बेकऱ्या आहेत, मात्र त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अन्न व प्रशासन विभाग अशा बेकऱ्यांकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *