मंडणगड : इनामदार इंग्लिश स्कूलमध्ये शिरून तोडफोड

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील वेसवी-शिपोळे येथील ‘इनामदार पब्लिक इंग्लिश स्कूल’च्या आवारात बेकायदेशीर प्रवेश करून शाळेचे नुकसान केल्याची आणि शिक्षक-विद्यार्थ्यांना धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुणे येथील रहिवासी आणि संस्थेचे चालक शफी यासीन इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार,

banner 728x90 banner 728x90

संशयित जमान सईद लांबे (वय ४५, रा. शिपोळे बंदर) याने २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते २३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत वारंवार शाळेच्या इमारतीत आणि आवारात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. शाळेचे प्रशासन किंवा शिक्षकांची कोणतीही परवानगी न घेता आरोपीने शाळेच्या कामात अडथळा निर्माण केला.


​आरोपीने खोडसाळपणा करत शाळेचा जिना आणि इमारतीच्या मुख्य दरवाजाला हिरव्या रंगाचा नेटचा कपडा बांधला. यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना येण्या-जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. एवढ्यावरच न थांबता, संशयिताने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्याच्या नळांची आणि पाईपची तोडफोड केली. या तोडफोडीत शाळेचे सुमारे २,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
​शाळेत प्रवेश केल्यानंतर संशयिताने तेथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना उद्धटपणे बोलून दमदाटी केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

यामुळे शाळेतील मुलांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
​संस्थेचे चालक शफी इनामदार (वय ६७, रा. हडपसर, पुणे) यांनी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जमान लांबे याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३२९(३), ३२४(२), ३५१(२) आणि १२६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मंडणगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शैक्षणिक संस्थेत अशा प्रकारे घुसखोरी करून तोडफोड केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *