संगमेश्वर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला असून तालुक्यातील पंचायत समितीवर महायुतीची सत्ता आली आहे. १४ जागांपैकी १० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजप- २, शिवसेना शिंदे गट-४ व राष्ट्रवादी अजित पवार गट- ४ उमेदवारांचा समावेश आहे.
तर तालुक्यातील ७ पैकी ४ जि. प. गटांवर शिवसेना शिंदे गट-भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जि. प. निवडणुकीतही तालुक्यात महायुतीने बाजी मारली आहे. मात्र तालुक्यात दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. माजी जिल्हा परिषद अध्य्क्ष रोहन बने व रचना महाडिक तसेच ज्येष्ठ नेते सहदेव बेटकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
पंचायत समिती निवडणुकीत धामापूर तर्फे संगमेश्वर- महेश जड्यार (भाजप), आरवली- प्रिया सुवरे (राष्ट्रवादी अजित पवार गट), कडवई- अपर्णा जाधव (शिवसेना ठाकरे गट), धामणी- दत्ताराम लाखण (शिवसेना ठाकरे गट), कसबा- सुरेश माईन (शिवसेना शिंदे गट), परचुरी- शर्वरी वेल्ये (शिवसेना शिंदे गट), माभळे- सुहास मायगडे (शिवसेना शिंदे गट), मुचरी- आरूषी घवाळी (राष्ट्रवादी अजित पवार गट), कोसुंब- दुर्वा पाष्टे (भाजप), निवेबुद्रुक- प्रफुल्ल बाईत (राष्ट्रवादी अजित पवार गट), साडवली- क्षमा जाधव (शिवसेना ठाकरे गट), हातीव- मंगेश बांडागळे (राष्ट्रवादी अजित पवार गट),दाभोळे- दिपाली जाधव (शिवसेना शिंदे गट), कोंडगाव- विद्यासागर तांदळे (शिवसेना ठाकरे गट) हे विजयी झाले आहेत.
तालुक्यातील ७ पैकी ४ जि. प. गटांवर शिवसेना शिंदे गट-भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जि. प. निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली आहे. यामध्ये जि. प. निवडणुकीत धामापूर तर्फे संगमेश्वर- सुशिल भायजे (राष्ट्रवादी अजित पवार गट), कडवई- संतोष थेराडे (शिवसेना ठाकरे गट), कसबा- विशाखा कुवळेकर (शिवसेना ठाकरे गट), मुचरी- माधवी गीते (शिवसेना शिंदे गट), कोसुंब-प्रमोद अधटराव (भाजप), साडवली- नेहा माने (शिवसेना ठाकरे गट), दाभोळे- विलास चाळके (शिवसेना शिंदे गट) हे उमेदवार विजयी झाले आहेत. जि. प. निवडणुकीत कोसुंब जि. प. गटात सर्वात हायहोल्टेज लढत झाली. याचे कारण या गटातून भाजपकडून प्रमोद अधटराव व शिवसेना शिंदे गटातून रोहन बने निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या गटात महायुतीमध्येच ही खऱ्याअर्थाने लढत झाली. या लढतीमध्ये भाजपच्या प्रमोद अधटराव यांनी रोहन बने यांचा पराभव केला.
कसबा जि. प. गटातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सौ. विशाखा विजय कुवळेकर यांनी प्रभावी कामगिरी करत विजय मिळवला. उबाठा शिवसेनेच्या उमेदवार म्हणून त्यांनी पारंपरिक शिंदे सेनेला मोठा धक्का देत अनेक वर्षांपासून असलेली एकहाती सत्ता मोडीत काढली. नवख्या उमेदवाराने मिळवलेल्या या दणदणीत यशामुळे कसबा गटाच्या राजकीय समीकरणात मोठा बदल झाल्याचे चित्र आहे. विजय घोषित झाल्यानंतर सौ. कुवळेकर यांनी मतदार बांधव भगिनींचे आभार मानले. निवडणूक काळात दिलेले प्रत्येक आश्वासन सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करून दाखवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विकासकामांना प्राधान्य देत काम करताना कोणत्याही परिस्थितीत राजकारण केले जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या विजयामुळे कसबा गटात नव्या नेतृत्वाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
साडवली जि. प. गटातून शिवसेना ठाकरे गटाच्या नेहा माने यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या रूपाली कदम यांचा पराभव केला. रूपाली कदम या प्रथमच निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या. कडवई जि. प. गटातून शिवसेना ठाकरे गटाचे संतोष थेराडे यांनी भाजपचे विनोद म्हस्के यांचा पराभव केला. या गटात कुणबी फँक्टर चालल्याचे बोलले जात आहे. मुचरी जि. प. गटात अटीतटीच्या लढतीत शिवसेना शिंदे सेनेच्या माधवी गिते यांनी विजय मिळवला आहे. या गटात माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या माधवी गिते या पूर्वी शिवसेना एकसंघ असताना कार्यरत होत्या.
शिवसेना फुटीनंतर त्या शिंदे सेनेत गेल्या होत्या. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून ललिता तांबे या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच या दोघींमध्ये थेट लढत होणार असल्याचे चित्र होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वातावरण चांगलेच तापले होते. अखेर निकालाच्या दिवशी माधवी गिते यांनी बाजी मारली. विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. धामापूर तर्फे संगमेश्वर जि. प. गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवखे उमेदवार सुशिल भायजे यांनी मातब्बर असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या सहदेव बेटकर यांचा दारूण पराभव केला. दाभोळे जि. प. गटातून शिवसेना शिंदे गटाचे विलास चाळके यांनी दणदणीत विजय मिळवला. ते सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार ठरले आहेत. त्यांनी वंचितच्या विरश्री बेटकर यांचा पराभव केला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















