संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावची सुवर्णकन्या आणि राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावणारी उदयोन्मुख खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे. अवघ्या लहान वयात आपल्या खेळाच्या जोरावर राज्य व राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवणाऱ्या तेजस्विनीच्या अकाली जाण्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात तेजस्विनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
तिला तातडीने कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र बुधवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. तेजस्विनी सनगले ही वांझोळे (ता. संगमेश्वर) येथील अत्यंत जिद्दी, मेहनती आणि गुणी खेळाडू म्हणून ओळखली जात होती. खो-खो या पारंपरिक खेळात तिने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. वांझोळे गावाने गेल्या काही वर्षांत खो-खो क्षेत्रात अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवले असून, “खो-खोचे गाव” अशी ओळख मिळवली आहे. या परंपरेतील तेजस्विनी ही एक आघाडीची आणि आशादायी खेळाडू होती.
विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी तिने भुवनेश्वर (ओडिशा) येथे झालेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवड मिळवली होती. त्या स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना एवढ्या कमी वयात राष्ट्रीय स्तरावर पोहोचणारी ती एक अभिमानास्पद खेळाडू ठरली होती.
तिच्या खेळाची खासियत म्हणजे तिचा वेग, चपळता आणि आक्रमकता. उंचीने लहान असली तरी मैदानावर तिची उपस्थिती मोठी भासायची. प्रतिस्पर्ध्यांना चकवण्याची तिची कला आणि झपाट्याने निर्णय घेण्याची क्षमता यामुळे ती संघासाठी अत्यंत महत्त्वाची खेळाडू बनली होती.
अनेक स्थानिक व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तिने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला होता. आज मात्र मैदानावर विजेच्या वेगाने धावणारी हीच तेजस्विनी आयुष्याच्या शर्यतीत हरली, ही बाब क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत वेदनादायक ठरली आहे. तिच्या निधनामुळे सनगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, वांझोळे गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खो-खो क्षेत्रासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील विविध मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून तेजस्विनीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत असून, तिच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
तेजस्विनीच्या रूपाने एक तेजस्वी तारा हरपला असला, तरी तिची जिद्द, परिश्रम आणि कर्तृत्व येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














