संगमेश्वर तालुक्यातील साडवली गावात एका अभिनंदनाच्या बॅनरमुळे अक्षरशः राजकीय रण पेटल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. बॅनरवरील कथित चिथावणीखोर मजकुरावरून दोन गट आमनेसामने आले, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या आणि शस्त्रांसह घरी जाऊन जाब विचारण्यापर्यंत प्रकरण चिघळले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच देवरुख पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे सेनेचे नेते अजित गवाणकर यांच्या पत्नी क्षमा जाधव-गवाणकर या साडवली पंचायत समिती गणातून विजयी झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी गावात बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर छापलेला “मोठमोठे गार केले गंमतमधी” हा मजकूर वादाचे कारण ठरला.
या मजकुरामुळे संतप्त झालेल्या विजय यशवंत धने उर्फ अभि धने आणि शुभम धने यांनी हातात कोयता व शिग घेऊन थेट संतोष जाधव यांच्या घरी जाऊन बॅनर कोणी लावला याचा जाब विचारल्याचा आरोप आहे. संध्याकाळपर्यंत बॅनर काढला नाही तर ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. याचवेळी दीपक डोंगरे व १० ते १५ अनोळखी व्यक्तींनीही घटनास्थळी येत हुज्जत घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेला दुसरी बाजूही तितकीच आक्रमक आहे. विजय यशवंत धने यांनी दिलेल्या प्रतितक्रारीनुसार, बॅनरवरील मजकूर चिथावणीखोर असल्याने त्यांनी तो काढण्याची विनंती केली. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बॅनर उतरवून उलटा करून ठेवला. त्यानंतर अजित गवाणकर व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जमावासह घटनास्थळी येत शिवीगाळ केली व ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या तक्रारीनुसार अजित गवाणकर यांच्यासह १६ नामनिर्देशित आणि सुमारे ५० ते ५५ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच या घटनेमुळे साडवली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्त वाढवत पुढील तपास सुरू केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















