रत्नागिरी : तुटलेली विद्युत तार जोडत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

banner 468x60

मालगुंड येथील महावितरण कार्यालयातील कर्मचारी सुबोध रवींद्र साळवी (रा. वरची निवेंडी पात्येवाडी) यांचे मंगळवारी वरवडे कुंभारवाडा येथे

banner 728x90

विद्युत खांबावरील विद्युत तार खाली जमिनीवर पडल्याने ती जोडणी करण्याचे काम करताना तीव्र स्वरूपाचा डाव्या हाताला शॉक लागल्याने मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुबोध साळवी हे मालगुंड येथील महावितरण कार्यालयात विद्युत लाईनमन म्हणून गेली १० वर्षे कार्यरत होते.

ते मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वरवडे कुंभारवाडा येथे विद्युत खांबावरील जमिनीवर पडलेल्या विद्युत तारीचे जोडणी करण्याचे काम करण्यासाठी गेले होते .

यावेळी विद्युत खांबावरील जमिनीवर पडलेल्या विद्युत तारीचे लाईन जोडणीचे काम करताना त्यांच्या डाव्या हाताला मोठ्या प्रमाणात शॉक बसला.

नजीकच असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिला असता त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि सुबोध यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बेशुद्ध अवस्थेत असल्याचे निदर्शनास येताच त्यांना तातडीने खाजगी वाहनाने खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

या ठिकाणी त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही.यावेळी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याबाबतची नोंद व पंचनामा जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत आहे. सुबोध साळवी हे मालगुंड महावितरण कार्यालयाचे अतिशय चलाख, अनुभवी आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून संपूर्ण मालगुंड पंचक्रोशीत ओळखले जात. तसेच त्यांचा प्रेमळ आणि अतिशय साधा स्वभाव सर्वांमध्ये विशेष परिचित होता.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने मालगुंड येथील महावितरण कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांबरोबर निवेंडी, भगवतीनगर, मालगुंड, गणपतीपुळे परिसरातील ग्रामस्थांमधून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *