भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी टीडब्ल्यूजे कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकर तसेच संचालक नेहा समीर नार्वेकर या दाम्पत्याला रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
नार्वेकर दाम्पत्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती गुंतवणूकदारांना समजताच न्यायालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी न्यायालय परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.
भरघोस परताव्याचे आश्वासन देत टीडब्ल्यूजे कंपनीमार्फत अनेक गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेतली जात होती. काही महिन्यांनंतर कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकर आणि संचालक नेहा समीर नार्वेकर यांनी गुंतवणूकदारांना आर्थिक गंडा घातल्याचे समोर आले.
या प्रकरणात चिपळूण येथील ठेकेदार प्रतीक माटे यांना दर महिन्याला गुंतवलेल्या रकमेवर ३ ते ४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या ३ लाख ५० हजार रुपयांसह त्यांच्या बहिणीचे २५ लाख रुपये असे एकूण २८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी चिपळूण पोलीस ठाण्यात नार्वेकर दाम्पत्यासह कंपनीच्या दोन प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फसवणूक झालेल्या अनेक गुंतवणूकदारांनी पुढे येत चिपळूणसह रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. गुंतवणूकदारांची संख्या आणि गुंतवणुकीची रक्कम लक्षात घेता या फसवणुकीची व्याप्ती कराडपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात यापूर्वीच संकेश घाग याला अटक करण्यात आली आहे. राज्यातील विविध ठिकाणी समीर नार्वेकर व नेहा नार्वेकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वी त्यांना ठाणे येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.
टीडब्ल्यूजे कंपनीचे शहरातील बायपास मार्गावर आलिशान कार्यालय असून तेथे मोठा कर्मचारी वर्ग कार्यरत होता. मात्र फसवणुकीचा प्रकार उघड होताच हे कार्यालय बंद करण्यात आले. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेने या कार्यालयाची तपासणी करून काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














