रत्नागिरी : अवैध गुरे वाहतुकीवर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील साठरेबांबर तळी येथे पोलिसांनी अवैध गुरे वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. एका आयशर टेम्पोतून चार बैलांची क्रूरपणे वाहतूक करताना दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत टेम्पोसह ८ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90


१८ डिसेंबर रोजी दुपारी २:१५ च्या सुमारास साठरेबांबर तळी येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी ऋषिकेश दिलीप खोंगे (वय २६) आणि अविनाश सुरेश गोसावी (वय २३, दोघेही रा. शाहूवाडी, कोल्हापूर) हे आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्रमांक MH-09/GJ-5585) मधून बैलांची वाहतूक करत होते. गुरे वाहतुकीचा परवाना असूनही त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे तपासात निष्पन्न झाले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोच्या हौद्यात चार गावठी बैलांना अत्यंत दाटीवाटीने आणि दोरीने बांधून ठेवले होते. या बैलांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती. तसेच, प्रवासादरम्यान त्यांना पाणी किंवा चारा न देता, त्यांना वेदना होतील अशा रितीने त्यांची वाहतूक केली जात होती.
या कारवाईत 8 लाख किमतीचा आयशर टेम्पो, 49 हजार किमतीचे चार बैल असा एकूण 8 लाख 49 हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.


याप्रकरणी पोलीस शिपाई दर्शना भिकाजी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१) मधील विविध पोटकलमे आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११९ अन्वये गुन्हा (गु.र.नं. २२३/२०२५) दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *