रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मटका जुगाराच्या अड्ड्यांवर धडक कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत.
एकाच दिवशी झालेल्या या कारवाईत चार आरोपींवर गुन्हे दाखल केला असून, त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्याभरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
लांजा येथे कल्याण मटका अड्ड्यावर कारवाई
लांजा बाजारपेठेतील शेटये पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या गल्लीमध्ये एका बंद टपरीच्या आडोशाला ३० जून २०२५ रोजी दुपारी २:४५ वाजता सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकला.
या कारवाईत दिलीप जनार्दन बाईत (वय ३६, रा. जाकादेवी मंदिर, लांजा) या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या ताब्यातून १५२० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा क्रमांक १२६/२०२५ दाखल करण्यात आला आहे.
गुहागरमध्ये मुंबई मटका अड्ड्यावर छापा
गुहागर तालुक्यातील आबलोली कोष्टीवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका प्लास्टिक कागदाच्या तात्पुरत्या शेडमध्ये ३० जून २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मुंबई मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून संजय आत्माराम उकार्डे (वय ५८, रा. गुहागर, आबलोली, कोष्टीवाडी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २८७० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुहागर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा क्रमांक ४६/२०२५ दाखल करण्यात आला आहे.
काजीरभाटी येथे मुंबई मटका जुगारावर कारवाई
रत्नागिरी तालुक्यातील काजीरभाटी, नेवरे येथील विजय एकनाथ मोरे यांच्या घराशेजारील गाडी पार्किंगसाठी तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या शेडमध्ये ३० जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुरू असलेल्या मुंबई मटका जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. या कारवाईत सुनील वासुदेव चाफेरकर (वय ४७, व्यवसाय मोलमजुरी, रा. नेवरे, काजीरभाटी, रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १३९० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे इतर साहित्य असा एकूण १३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा क्रमांक १२९/२०२५ दाखल करण्यात आला आहे.
खेडमध्येही मुंबई मटका जुगारावर धाड
खेड तालुक्यातील बोरवाडी पिरलोटे येथे ३० जून २०२५ रोजी सायंकाळी ६:५० वाजता मुंबई मटका जुगार खेळवणाऱ्या एका आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत अंबाजी सदाशिव कडु (वय ५४, रा. बोरवाडी पिरलोटे, खेड) आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून २९०० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे इतर साहित्य असा एकूण २९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा क्रमांक २१२/२०२५ दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*