रत्नागिरी : आंबा घाटातील दरोडा प्रकरणाचा पूर्ण उलगडा; आठही आरोपी देवरूख पोलिसांच्या ताब्यात

banner 468x60

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात घडलेल्या धक्कादायक दरोडा, अपहरण आणि खंडणी प्रकरणाचा देवरूख पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पूर्ण उलगडा केला असून या प्रकरणातील सर्व आठ आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. शनिवारी अखेरच्या आरोपीला अटक झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला शेवटचा आरोपी संतोष बाळू गोसावी (वय ३८, रा. टीआरपी, रत्नागिरी) याला शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

नेमकी घटना काय घडली?
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील प्रथमेश तानाजी दळवी हे बुधवारी सायंकाळी रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी येथून आपल्या बोलेरो गाडीत म्हैस घेऊन कोल्हापूरकडे रवाना झाले होते. रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातील दख्खन परिसरात त्यांच्या गाडीला अचानक दोन संशयित वाहनांनी अडवले.

एक थार गाडी, ज्यावर “पांडुरंगा” असे लिहिले होते, आणि दुसरी भारत सरकारचा लोगो लावलेली इनोव्हा — या दोन वाहनांतून आलेल्या आठ जणांनी दळवी यांची बोलेरो गाडी अडवून त्यांना जबरदस्तीने खाली ओढले. आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवले.

पेट्रोल पंपावर नेऊन खंडणीची मागणी
यानंतर आरोपींनी दळवी यांना साखरपा येथील गंद्रे पेट्रोल पंपावर नेले. तेथे त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. दळवी यांच्या बोलेरो गाडीच्या केबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतले. एवढेच नव्हे तर, “जर पोलिसांत तक्रार केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी देत आरोपी पसार झाले.

देवरूख पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळ, सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची माहिती, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

प्रारंभी पाच आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी आणखी दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. शनिवारी संतोष गोसावी याला अटक करून पोलिसांनी या टोळीतील सर्व आठ आरोपींना गजाआड केले.
अल्पावधीत संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करून सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळवल्याने देवरूख पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे महामार्गांवरील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *