रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असा शोध लागला असून राजवाडी ते वाडीखुर्द परिसरातील जामसंडेच्या जंगलात पाच प्राचीन कातळकोरीव लेणी आढळून आली आहेत. या शोधामुळे इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या लेण्यांपैकी तीन लेणी एका कातळकड्यात एकाच रांगेत कोरलेली असून उर्वरित दोन लेणी जवळच आढळतात. स्थानिक ग्रामस्थ या स्थळाला ‘आडीवरेच्या श्रीदेवी महाकालीचे विश्रांतीस्थान’ म्हणून ओळखतात. लेण्यांच्या आतील रचनेत पादपीठ आणि त्यावर शिवलिंग स्थापनेसाठी केलेली गोलाकार खोबण स्पष्ट दिसून येते. यावरून ही लेणी शैव पंथ परंपरेशी संबंधित असल्याचा प्राथमिक निष्कर्ष संशोधकांनी मांडला आहे.
पुण्यातील इतिहास संशोधक अनिल दुधाणे आणि अभ्यासक विनोद पवार यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देत या लेण्यांचा शोध लावला. यापूर्वीही त्यांनी गोठणेदोनिवडे येथील एकाश्म मंदिर प्रकाशात आणले होते.
संशोधकांच्या मते, कोदवली, पांगरे, सोगमवाडी, गोठणेदोनिवडे, सागवे आणि मिठगवाणे या भागांत यापूर्वी सापडलेल्या लेणी व एकाश्म मंदिरे यांच्याशी या नव्या शोधाचा संबंध असू शकतो. त्यामुळे ही सर्व स्थळे एकाच ऐतिहासिक कालखंडातील असावीत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रचनेच्या दृष्टीने पाहता, पश्चिमाभिमुख कातळकड्यात साधारण १० ते १५ फूट उंचीवर तीन लेणी कोरलेली आहेत. त्यांची प्रवेशद्वारे ४ ते ५ फूट उंच व २ ते २.५ फूट रुंद असून आतील भाग सुमारे ४ फूट रुंद व ३ फूट लांबीचा आहे. पादपीठासह शिवलिंगासाठी खोबण ही या लेण्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. जवळच असलेल्या दोन लेण्यांपैकी एक लहान असून दुसरे अधिक मोठे आणि सुबक आहे. मोठ्या लेण्यात सुमारे ५ फूट रुंद, ८ फूट लांब व ५.५ फूट उंचीचे गर्भागृह तसेच प्रशस्त सभामंडप आढळून येतो.
या लेणी केवळ धार्मिक स्थळे नसून कोकणातील प्राचीन सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि स्थापत्य वारशाची जिवंत साक्ष असल्याचे मत व्यक्त होत आहे. भविष्यात या ठिकाणाचे सखोल संशोधन आणि संवर्धन केल्यास कोकणाच्या इतिहासातील अनेक अनोळखी पैलू उजेडात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











