गुहागर : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू

banner 468x60

गुहागरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला अनेक तास योग्य उपचार न दिल्याने प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची गंभीर व धक्कादायक घटना मंगळवारी गुहागर ग्रामीण रुग्णालयात घडली.

banner 728x90

या घटनेमुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, वरवेली येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांनी केला आहे.

गुहागर तालुक्यातील वरवेली येथील शिंदे आडनावाच्या गर्भवती महिलेला मंगळवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास प्रसूतीसाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल केल्यानंतर सकाळी ८ वाजेपर्यंत प्रसूती न झाल्याने महिलेची प्रकृती तपासून तिला तातडीने अन्यत्र हलवावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली होती.

मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी राहुल हजारे यांनी ‘नॉर्मल प्रसूती होईल’ असे सांगत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास नकार दिला, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

प्रसूतीपूर्व आवश्यक असलेली सोनोग्राफी व इतर वैद्यकीय अहवाल नीट तपासले गेले नाहीत. तसेच अनेक तास महिला रुग्णाला पुरेशा उपचारांशिवाय ताटकळत ठेवण्यात आल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. मात्र, जन्मानंतर काही वेळातच नवजात बाळाची प्रकृती खालावली आणि उपचार सुरू असतानाच बाळाचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच वरवेली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. संतप्त नागरिकांनी संबंधित डॉक्टरांना जाब विचारत, वेळेत योग्य उपचार न दिल्यामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी करत रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने आपली चूक मान्य केल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत असून, या बाबत अधिकृत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *