मंडणगड : मालकीण आजारपणामुळे मुंबईला, ड्रायव्हरनेच कारखान्यावर मारला डल्ला

banner 468x60

मालकीण आजारपणामुळे उपचारासाठी मुंबईला गेल्याची संधी साधून, त्यांच्या स्वतःच्या गाडीवरील ड्रायव्हरने दोन साथीदारांच्या मदतीने बंद कात कारखान्यातून सुमारे १ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची धक्कादायक घटना मंडणगड तालुक्यातील शेनाळे–बर्गेवाडी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाणे येथे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

याबाबत स्वाती विजय काते (वय ४७, रा. शेनाळे–बर्गेवाडी) यांनी तक्रार दिली असून त्या कात कारखान्याच्या मालकीण आहेत. जानेवारी महिन्यात स्वाती काते यांना टायफॉईड झाला होता. तसेच त्यांच्या मुलीचीही प्रकृती खालावल्याने त्या दोघी उपचारासाठी मुंबईला गेल्या होत्या. कारखाना बंद असल्याचे लक्षात येताच, त्यांच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत असलेला सोनाजी रमेश लोकरे (उर्फ गणेश) याने आपल्या दोन साथीदार अनिकेत राजेश मोरे व अक्षय जगन्नाथ कचरे (तिघेही रा. कराड, जि. सातारा) यांच्या मदतीने चोरीचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

२४ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत आरोपींनी कारखान्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करत तांब्याची वायर, पेट्रोल मशिन, सायलेंट जनरेटर, ऑटो वॉल, ड्रिल मशिन, इलेक्ट्रिक मशिन, प्रेशर मीटर तसेच ॲल्युमिनियम शीट असा मुद्देमाल लंपास केला.

फिर्यादी स्वाती काते यांनी २४ फेब्रुवारी रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०६ व ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे.


विश्वासू नोकरानेच मालकाचा विश्वासघात करत चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींच्या शोधासाठी मंडणगड पोलीस कराड परिसरात पथक रवाना करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *