मंडणगड : नगरपंचायतीस ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत मैला संकलन गाडी प्राप्त

banner 468x60

स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी मंडणगड नगरपंचायतीला “स्वच्छ महाराष्ट्र अभियान” अंतर्गत अत्याधुनिक मैला संकलन गाडी (सक्शन टँक) प्राप्त झाली आहे.

banner 728x90

या गाडीमुळे शहरातील तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील शौचालय टाक्यांची स्वच्छता अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि वेळेत होणार आहे.


आजच्या घडीला सांडपाणी व सेप्टिक टँक साफसफाईसाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. खासगी यंत्रणांवर अवलंबून राहावे लागल्याने खर्च वाढत होता तसेच वेळेवर सेवा मिळत नव्हती. नव्याने प्राप्त झालेल्या या सक्शन टँक गाडीमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.

नगरपंचायतीकडून ही सेवा लवकरच नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार असून त्यासाठी वाजवी दर निश्चित केले जाणार आहेत. या सेवेमुळे केवळ शहरी भागच नव्हे तर तालुक्यातील इतर गावांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे पर्यावरण संरक्षणास हातभार लागेल तसेच अस्वच्छतेमुळे उद्भवणाऱ्या रोगांवरही नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

ही गाडी नगरपंचायतीला उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या प्रक्रियेत नगराध्यक्ष सोनल बेर्डे , सर्व सभापती, नगरसेवक, मुख्याधिकारी रोडगे, बांधकाम विभाग प्रमुख मनोज मर्चंडे, स्वच्छता विभाग प्रमुख विकास साळवी, शहर समन्वयक रोशन बेलोसे तसेच सर्व नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

याबद्दल उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता आणि आरोग्य समितीचे सभापती वैभव राम कोकाटे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “स्वच्छता हीच सेवा या तत्वावर आम्ही काम करत असून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध आहे. ही गाडी त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.” मंडणगड शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *