मंडणगड : जमिनीच्या वादाची पार्श्वभूमी; भावाकडून भावाला बेदम मारहाण

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील कोन्हवली गावात सख्ख्या भावाकडूनच भावावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराच्या बांधकामाच्या जागेवर दारू पिण्यास विरोध केल्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आला असून, या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

फिर्यादी दीपक पांडुरंग गमरे (वय ४८) आणि आरोपी निखिल पांडुरंग गमरे हे सख्खे भाऊ असून त्यांच्यामध्ये पूर्वीपासूनच जमिनीच्या कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दीपक गमरे यांना ग्रामपंचायतीमार्फत घरकुल मंजूर झाले असून त्यांनी नवीन घराच्या बांधकामासाठी जोते बांधले आहे.


२१ मार्च रोजी रात्री सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी निखिल गमरे हा या बांधकामाच्या ठिकाणी बसून दारू पीत होता. यावेळी दीपक गमरे यांनी त्याला त्या ठिकाणी दारू पिऊ नको, येथे घराचे बांधकाम करायचे आहे, असे समजावून सांगितले. मात्र, याचा राग आल्याने आरोपीने उर्मटपणे उत्तर देत शिवीगाळ व धक्काबुक्की सुरू केली.
वाद वाढल्याने दीपक गमरे हे तेथून निघून आपल्या मित्र प्रकाश तांबे यांच्या घरी गेले. मात्र, आरोपी निखिल गमरे त्यांचा पाठलाग करत तेथेही पोहोचला.

त्याने दीपक यांना जमिनीवर ढकलून दिले आणि हातातील बांबूच्या काठीने त्यांच्या डाव्या हातावर व पायावर जबर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली.


या हल्ल्यात दीपक गमरे जखमी झाले असून त्यांनी तात्काळ मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी २५ मार्च रोजी दुपारी १:४० वाजता आरोपी निखिल गमरे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व (३) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ०९/२०२६) दाखल केला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *