मंडणगड : वाळू माफियांचा सुळसुळाट; तीन डंपरसह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

मंडणगड तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांवर महसूल विभागाच्या कारवाईचा जोरदार धडाका सुरू आहे. गेल्या काही दिवसांत मंडणगड तालुक्यात तीन स्वतंत्र घटनांमध्ये अनधिकृत वाळूची वाहतूक करताना तीन डंपरसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ६ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सर्व आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

‘प्रातिनिधिक फोटो’ (Representative photo) 


पहिला गुन्हा: मंडणगडचे मंडळ अधिकारी मनोहर यशवंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता शिरगाव-पाट रस्त्यावर एका डंपरमधून वाळूची चोरी करत असताना फाईक जैनुद्दीन मांडलेकर (रा. म्हाप्रळ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू आणि २ लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करण्यात आला.


दुसरा गुन्हा: मंडळ अधिकारी संतोष रघुनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता म्हाप्रळ येथे मकबुल हुसेन मिया मखजनकर (रा. म्हसळा) हा त्याच्या डंपरमधून दीड ब्रास वाळूची चोरटी वाहतूक करत असताना पकडला गेला. या कारवाईत १५ हजार रुपये किमतीची वाळू आणि २ लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करण्यात आला.


तिसरा गुन्हा: मंडळ अधिकारी निलेश प्रल्हाद गोडघासे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ सप्टेंबर रोजी पहाटे २.०० वाजता दहागाव येथे सिद्धेश शांताराम जाधव (रा. दापोली) हा दीड ब्रास वाळूची चोरटी वाहतूक करत असताना पकडला गेला. त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीची वाळू आणि २ लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करण्यात आला.


महसूल विभागाच्या परिपत्रकानुसार, तहसिलदारांच्या आदेशानंतरच अशा प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. त्यानुसार, मंडणगडचे तहसीलदार यांनी ११ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हे आदेश तक्रारदारांना १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.०५ वाजता प्राप्त झाल्यानंतर १३ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मंडणगड पोलीस ठाण्यात या तिन्ही घटनांचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

या कारवाईमुळे वाळू माफियांना मोठा हादरा बसला असून, प्रशासनाने यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *