रायगड जिल्ह्यातील महाड येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांची अचानक बदली करण्यात आल्याने पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. या बदलीविरोधात तडवी यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. तसेच आत्महत्या झाल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची स्पष्ट मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी आपल्या पत्रात आपण अनुसूचित जमातीतील (खालच्या जातीतील) अधिकारी असल्याने आपल्यावर अन्यायकारक कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक आणि दबाव तंत्र वापरले जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तडवी यांची कोणतीही ठोस कारणे न देता तडकाफडकी बदली करण्यात आली असून ही बदली सूडबुद्धीने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पत्रात पुढे नमूद केल्यानुसार, महाड नगरपरिषद निवडणुकीच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप तडवी यांनी केला आहे. संबंधित प्रकरणात बनावट स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तिघांना बेकायदेशीररीत्या अटक करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कारवाई करण्यास आपण नकार दिल्याने आपली बदनामी करण्यात आली आणि अखेर बदलीचा निर्णय लादण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे.
आपल्या पत्रात तडवी यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सार्वजनिक तसेच कार्यालयीन पातळीवर आपला अपमान केल्याचेही नमूद केले आहे. सातत्याने होणारा मानसिक छळ आणि अन्यायकारक वागणूक यामुळे आपण अत्यंत नैराश्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. न्याय मिळाला नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, असे टोकाचे विधान त्यांनी पत्रात केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक रमेश तडवी सध्या आपल्या कुटुंबीयांसमवेत घरीच असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. या संदर्भात माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी सांगितले की, तडवी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू असून चर्चा पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस दलातील अंतर्गत कारभार, दबावाचे राजकारण आणि अनुसूचित जाती-जमातीतील अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. आता पोलीस महासंचालक आणि गृह विभाग या प्रकरणावर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















