लांजा : प्रेमसंबंध घरच्यांना कळल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

banner 468x60

लांजा तालुक्यातील गवाणे येथील ३८ वर्षीय विवाहित रिक्षाचालकाने घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लग्न झालेले असताना अन्य एका महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध घरच्या सर्वांना कळल्याच्या नैराश्यातून त्याने हा प्रकार केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

गवाणे येथील विनायक आनंद कांबळे (३८) हा रात्र पाळीमध्ये लांजा येथे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवत होता. लग्न होऊन आठ वर्षे उलटूनही मुलबाळ होत नसल्याने तो निराश होता. त्याचे लांजा येथे राहणाऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याची माहिती घरच्या मंडळींना मिळाली. मंगळवारी विनायकला घेऊन त्याचे आईवडील व त्याची पत्नी त्या महिलेकडे गेले.

ती महिला व विनायकची एकत्र समजूत काढण्यात आली. यापुढे आम्हा दोघांमध्ये कोणताच संबंध राहणार नाही, असे आश्वासन विनायकने दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता. रात्री जेवून सर्व कुटुंब झोपी गेले. सकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान पत्नी उठली, त्यावेळी विनायक झोपलेला होता.

त्यानंतर तीही झोपली. नंतर विनायकने रिक्षाची केबल घेऊन घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला. ५:३० वाजता पत्नी उठली असता विनायक आपल्या जागेवर नसल्याने शोधाशोध करण्यात आली. तो आसपास प्रातर्विधीसाठी गेला असेल असे सर्वांना वाटले. त्याची आई सकाळी अंगणात आली असता तिला आंब्याच्या झाडाला विनायक लटकत असल्याचे दिसले.

तिने आरडाओरडा केल्यानंतर विनायकचे वडील, पत्नी धावत आली. विनायकने आत्महत्या केल्याची खबर वडील आनंद सयाजी कांबळे यांनी लांजा पोलिसांनी दिली आहे. आनंद यांना विवाहित तीन मुली आहेत. विनायक हा एकुलता मुलगा असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमोद सरगले अधिक तपास करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *