दिवाळी सुट्टीत पर्यटकांची कोकणला पसंती

banner 468x60

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणातील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा ओघ सुरू होणार आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथून परिसरातून येथे सुमारे १० ते १५ लाख पर्यटक दाखल होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.


कोकणातील रिसॉर्टमध्ये १० नोव्हेंबरपासूनच पर्यटकांनी बुकिंग करून ठेवले आहे. पुढच्या काळातील बुकिंगसाठी पर्यटकांकडून चौकशी केली जात आहे.

काहींनी मात्र तीन-चार महिने आधीच नियोजन करून कोकणात दिवाळी साजरी करण्याचे पक्के केले आहे.मुंबई-पुण्यातील धावपळीपासून दूर, नीरव शांतता अनुभवत समुद्राच्या साक्षीने दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणात येत असतात.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, काशीद, हरिहरेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर, दापोली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण व कुडाळ, निवती, आचरा, तारकर्ली, सावंतवाडी, आंबोली या ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती असते.

कोकणाला लाभलेला अथांग समुद्रकिनारा हे पर्यटनाचे मुख्य आकर्षण असते. कोकणातील नमन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि येथील विविध कलाप्रकार दाखविण्यासाठी काही रिसॉर्टमधून सायंकाळच्या वेळी याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्यटकांना केवळ शांतता हवी असते.

इथला निसर्ग अनुभवायचा असतो आणि म्हणून न चुकता ही कुटुंब येथील शांत वातावरणाचा अनुभव घेत दिवाळी साजरी करण्यासाठी येतात. अनेक कुटुंबांना कोकणची माहिती सांगितली जात असल्याने येथील पर्यटन उद्योगाला चालना मिळत राहते.

पर्यटकांना येथील सुंदर समुद्र किनाऱ्यांचा, येथील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेताना मनोरंजनाचे चार क्षण घालवता यावेत यासाठी कोकणातील संगीत कार्यक्रम, डॉल्फिन सफारी यांचे आयोजन पर्यटन व्यावसायिक करतात’, असे दापोली येथील पर्यटन व्यावसायिक मंगेश मोरे यांनी सांगितले.

समुद्रातील सफर, किनाऱ्यांवरील विविध खेळ, डॉल्फिन दाखविण्याची व्यवस्था यासाठी बोटींची व्यवस्था करण्यापासून पर्यटकांचे विविध प्रकारे मनोरंजन करण्यासाठी येथील पर्यटन व्यावसायिक सज्ज झाले आहेत. कोकणातील निसर्गाची माहिती व्हावी, येथील जैवविविधता कळावी यासाठी निसर्ग सहलींचे आयोजनही काही निसर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *