कोकण : ‘कोकण चित्रपट महोत्सव’11 ते 16 डिसेंबर दरम्यान रंगणार

banner 468x60

कोकण म्हणजे कलेची आणि कलाकारांची खाण. आजवर असंख्य कलाकार या मातीत तयार झाले. अनेकांनी त्यांची कारकीर्द गाजवली.

याच कोकणातल्या मातीतल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत कोकण चित्रपट महोत्सवाची सुरुवात केली.

पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या महोत्सवासाठी ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ सज्ज झाला आहे. यंदा या कोकण चित्रपट महोत्सवाचे दुसरे वर्ष असून सोमवार ११ डिसेंबर ते शनिवार १६ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे.

सिंधुदुर्गात ११ डिसेंबरला महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर मराठी चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. १२ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये उद्घाटन सोहळा आणि चित्रपटांचे प्रदर्शन तर १३ व १४ डिसेंबरला मराठी चित्रपटांचे प्रदर्शन संपन्न होईल.

१५ डिसेंबरला सिंधुदुर्गात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यात कोकणातील मान्यवर कलाकार वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. १६ डिसेंबरला बक्षीस समारंभ आणि महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न होईल.

या महोत्सवासाठी आपले चित्रपट दाखविण्यास इच्छुक असणाऱ्या चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांनी ५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबपर्यंत आपले प्रवेश अर्ज kokanchitrapatmahotsav@gmail. com या ई-मेल आयडीवर सादर करायचे आहेत.

जानेवारी २०२२ ते ऑगस्ट २०२३ या वर्षांत सेन्सॉर संमत झालेले मराठी चित्रपट यासाठी पात्र असणार आहेत. महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रपटांच्या स्पर्धेतून सर्वोत्तम चित्रपटाची निवड केली जाईल.

कोकणातल्या मातीत अनेक हरहुन्नरी कलाकार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने या कलाकारांना चित्रपट माध्यमाशी जोडले जाण्याची संधी मिळते. ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर सांगतात.

गेल्या वर्षी या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून याही वर्षी उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *