रत्नागिरी : जिल्ह्यात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 138 जणांवर कारवाई

banner 468x60

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अलर्ट झालेल्या पोलिस यंत्रणेकडून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या १३८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90

गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर तसेच सोशल मीडियावरदेखील आक्षेपार्ह मेसेज पसरवणाऱ्यांवर कटाकक्षाने नजर ठेवण्यात आली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. आचारसंहिता लागू होताच प्रशासन यंत्रणाही वेगाने कार्यन्वित झालेली आहे.

त्यावेळी या निवडणुकीदरम्यान सार्वजनिक शांतता कायम राहण्यासाठी प्रशासन स्तरावर कार्यवाही केली जात आहे. या निवडणुकीदरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने खबरदारीची पावले उचलली आहेत.

गुन्हेगारी रोखण्यासाठी तीव्र कारवाई मोहीम हाती घेतली असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे. आचारसंहिता लागू होताच या मतदार संघात कारवाई मोहिमेत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांना चाप लावण्यात आला आहे.


सीआरपीसी १०७ प्रमाणे १३८ जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. तसेच सीआरपीसी ११० अन्वये ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. संशयास्पदरित्या दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दहा जणांवर सीआरपीसी १०९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

याच कालावधीत अवैद्य दारू विक्री करणाऱ्या ७ जणांना कारवाईच्या कचाट्यात पकडण्यात आले आहे. या निवडणुकीदरम्यान वेळोवेळी पोलिसांच्या गुन्हेगारी पटलावर आलेल्यांवर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर नजर ठेवण्यात आली असल्याचे धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे.


सायबर सेलचे वेगळे पथक
सोशल मीडियावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिस दलाच्या सायबर सेलचे वेगळे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणे, बदनामीकारक मजकूर, जातीय तेढ निर्माण होईल, असे मेसेज यांचा राजकीय कारणासाठी वापर होऊ नये, याकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन झाल्यास त्याची प्रकषनि दखल घेतली जाणार असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *