गुहागर : नरवण येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

banner 468x60

तालुक्यातील मौजे येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढून

नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ डिसेंबर रोजी उपेंद्र नाटूसकर यांनी मौजे नरवण सुतारवाडी येथे त्यांचे मालकीच्या विहिरीमध्ये बिबट्या पडला

असल्याची माहिती दूरध्वनीद्वारे वन विभागाला दिली. या माहितीच्या अनुषंगाने राजश्री कीर (वनक्षेत्रपाल चिपळूण) व त्यांचे अधिनस्त कर्मचारी बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले

व या बिबट्यास काही वेळात लोखंडी पिंजरा व दोरीच्या सहाय्याने सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात आले. विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी, गुहागर यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हा मादी बिबट्या सुस्थितीत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या मादी बिबट्याचे वय अडीच ते तीन वर्षे आहे. या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी (चिपळूण) दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर, गुहागरचे वनपाल संतोष परशेट्ये, रामपूरचे वनरक्षक राजाराम शिंदे, कोळकेवाडी वनरक्षक राहूल गुंठे, अडूरचे वनरक्षक संजय दुडंगे, रानवीचे वनरक्षक अरविंद मांडवकर यांनी सक्रीय कामकाज करत बिबट्याला पोलिस कर्मचारी पोलिसपाटील नरवण आणि ग्रामस्थांच्या मदतीने केले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास तत्काळ माहिती देण्याकरता वन विभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *