दापोली : खासगी बसचालकांकडून भरमसाठ भाडे

banner 468x60

शिमगोत्सवानिमित्त गावात दाखल झालेले मुंबईस्थित चाकरमानी पुन्हा शहराकडे निघाले आहेत.

रेल्वे आणि एसटी बसचे आरक्षण मिळत नसल्यामुळे अनेकांनी खासगी बसगाड्यांनी मुंबईला जाणे पसंत केले; मात्र त्यासाठी त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.

दरवर्षी होळीनिमित्त मुंबईमधून मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात आणि पुन्हा मुंबईला येतात. यावर्षी मुंबईस्थित कोकणवासियांनी महिन्यांपूर्वीच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या, एसटीच्या बसगाड्यांचे आरक्षण केले होते;

मात्र अनेकांना रेल्वेगाड्या आणि एसटी बसगाड्यांचे आरक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे अनेकांनी खासगी बसगाड्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. खासगी बस कंपन्यांनी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अव्वाच्यासव्वा भाडे आकारण्यास सुरवात केली आहे.

कोकणातून मुंबईत जाणाऱ्या गाड्यांसाठी ठिकाणानुसार सुमारे ७०० ते १७०० रुपयांदरम्यान तिकीट दर आकारले जात आहे. होळीसाठी मुंबईस्थित कोकणवासियांनी अधिकची पदरमोड करत खासगी बसगाडीने गाव गाठले.

आता मुंबईत जाताना सुद्धा त्यांना अधिकचे भाडे द्यावे लागत आहे. होळीनिमित्त कोकणातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळानेही जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला;

मात्र अनेक गाड्यांचा दर्जा चांगला नसल्यामुळे त्यांनी एसटीपेक्षा खासगी गाड्यांना पसंती दिली आहे.

चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात मुंबई-पुणेकडे जाणारी वाहने लागतात. बसस्थानकावरून प्रवासी पळवण्याचा प्रकार होतो. मार्कंडीतील पेट्रोलपंप, बहादूरशेख नाका खासगी वाहतुकीच्या गाड्या लागतात; मात्र आरटीओ किंवा आगार व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

– उदय जोगळेकर, चिपळूण

खासगी बसचे तिकीट दर
रत्नागिरी ते मुंबई – ६९९ ते १,२०० रुपये
गुहागर ते मुंबई – ५९९ ते ८९९ रुपये
चिपळूण ते मुंबई – ६९९ ते १,२०० रुपये

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *