खेड : लोटे एमआयडीसीतील दूषित जलवाहिनी फुटल्याने दूषित पाणी थेट नदीत, मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू

banner 468x60

दीपावलीच्या सणातच पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी वाहून नेणारी जलवाहिनी कोतवली गावाजवळ फुटल्याने वाशिष्ठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

banner 728x90

औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करूनच नदीत सोडले जाणे अपेक्षित असते. मात्र, दीपावलीच्या सुट्टीचा गैरफायदा घेत काही कारखान्यांनी जलशुद्धीकरणाची प्रक्रिया न करताच दूषित पाणी थेट नदीत सोडल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

परिणामी, दूषित पाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्याने हे विषारी पाणी कोतवलीजवळच्या नदीपात्रात मिसळले आणि मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे नदीवर अवलंबून असलेल्या मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. संतप्त ग्रामस्थांनी त्वरित जलवाहिनीची दुरुस्ती आणि मृत माशांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी केली आहे. “पंचनामा होईपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीस परवानगी देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर एमआयडीसीचे ठेकेदार आणि डेप्युटी इंजिनिअर आर. जी. कुळकर्णी यांच्या उपस्थितीत २७ ऑक्टोबर रोजी कोतवली ग्रामपंचायतीत एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक होणार आहे. यात एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलशुद्धीकरण केंद्राचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

“दूषित पाणी वाहून नेणारी जलवाहिनी तत्काळ दुरुस्त करावी आणि मच्छीमारांच्या नुकसानीचा पंचनामा करावा,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी केली आहे.

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने लोटे औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण प्रक्रियेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या बैठकीत दोषींवर नेमकी काय कारवाई होते, याकडे खेड तालुक्यातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *