खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला परिसरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या एका निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. ५५ वर्षीय शफी अब्दुल्ला वरवटकर यांचा तिघांकडून झालेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला असून, या प्रकरणी खेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मेटे मोहल्ल्यातील कब्रस्तानजवळील रस्त्यावर ही घटना घडली. शफी वरवटकर हे त्या परिसरातून जात असताना पूर्वीपासून असलेल्या वादाच्या कारणावरून आरोपींनी त्यांना अडवले. सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली, मात्र काही वेळातच हा वाद उग्र स्वरूप धारण करत हिंसाचारात बदलला.
आरोपी कादिर शमशुद्दीन घारे, गणी इस्माईल बोट आणि अशरफ महामुद बोट यांनी एकत्र येत शफी वरवटकर यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी शिवीगाळ करत त्यांच्या छातीवर हाताच्या बुक्यांनी वारंवार प्रहार केले, तसेच लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, शफी वरवटकर यांची काही काळापूर्वी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झालेली होती. ही बाब माहिती असूनही आरोपींनी निर्दयपणे मारहाण केल्याचे समोर आले आहे.
या गंभीर मारहाणीत शफी वरवटकर यांची प्रकृती क्षणातच खालावली आणि ते जागीच कोसळले. स्थानिकांनी तत्काळ धाव घेऊन मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी मृताचे चुलत भाऊ शेखअली हसन वरवटकर (वय ४४) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कादिर घारे, गणी बोट आणि अशरफ बोट या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९/२०२६ नुसार दाखल केला आहे. हा गुन्हा ७ एप्रिल रोजी पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास नोंदवण्यात आला.
घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण अधिक स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे मेटे मोहल्ला आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा कसून तपास करून दोषींना न्यायालयात उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













