मेंदू व मणक्यांच्या विकारांबाबत जागरूकता वाढविण्यासाठी आणि रुग्णांना तज्ज्ञ उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सांगली येथील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. मदन जाधव दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी चिपळूण येथे ओपीडी घेणार आहेत. बहादुरशेख नाका येथील एव्हरशाईन बी-बिल्डिंगमधील शॉप नं. ०३ येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

डॉ. जाधव यांनी पॅरालिसिस (स्ट्रोक/लकवा), मणक्यांचे विकार तसेच अपघातातील डोक्याच्या दुखापती याबाबत महत्वाची माहिती देताना सांगितले की, पॅरालिसिसचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. मेंदूला रक्तपुरवठा करणारी नस ब्लॉक झाल्यामुळे होणारा स्ट्रोक (ब्रेन इस्किमिया) आणि मेंदूमधील नस फुटून रक्तस्त्राव झाल्यामुळे होणारा स्ट्रोक (ब्रेन हॅमरेज). या दोन्ही प्रकारांमध्ये तोंड वाकडे होणे, जीभ जड होणे, हात-पायात अशक्तपणा येणे किंवा शरीराच्या एका बाजूची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. मात्र या दोन्ही प्रकारांची कारणे आणि उपचार पद्धती वेगवेगळी असल्यामुळे रुग्णाचे अचूक निदान करणे अत्यंत आवश्यक असते.

स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये पहिल्या तीन तासांचा कालावधी अत्यंत महत्वाचा मानला जातो. या कालावधीत योग्य निदान आणि उपचार झाले तर रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता असते. मात्र वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मणक्यांच्या विकारांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक रुग्ण मणक्याच्या ऑपरेशनबाबत भीती व्यक्त करतात. प्रत्यक्षात मान किंवा पाठीच्या मणक्यांचे बहुतांश विकार हे योग्य औषधोपचार व उपचार पद्धतींनी ऑपरेशनशिवायही बरे होऊ शकतात. मात्र सुरुवातीचा त्रास दुर्लक्षित करून रुग्ण उशिरा डॉक्टरांकडे जातात, त्यामुळे आजार गंभीर होण्याची शक्यता वाढते. मणक्यांचे आजार विविध प्रकारचे असल्याने दुसऱ्या रुग्णाचा अनुभव ऐकून भीती बाळगण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते, असेही त्यांनी सांगितले.
तसेच अपघातातील रुग्णांबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. अपघातात डोक्याला मार लागल्यास, रुग्ण बेशुद्ध झाल्यास, फिट आली असल्यास, उलटी होत असल्यास किंवा नाक व कानातून रक्त येत असल्यास तात्काळ सीटी स्कॅन करणे आवश्यक असते. अशा वेळी न्युरोसर्जन डॉक्टरांचा सल्ला घेणे रुग्णासाठी फायद्याचे ठरते. अपघाताच्या रुग्णांमध्ये वेळेचे महत्त्व खूप असल्याने शक्य तितक्या लवकर योग्य रुग्णालयात उपचार सुरू होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सांगली येथील जाधव न्युरोसर्जिकल केअर सेंटरमध्ये मेंदू व मणक्यांच्या सर्व प्रकारच्या विकारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध आहेत. अपघात, पॅरालिसिस तसेच मेंदूच्या इतर गंभीर विकारांच्या रुग्णांसाठी २४ तास आपत्कालीन सेवा, सुसज्ज आयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा येथे उपलब्ध आहे.
चिपळूण येथे होणाऱ्या ओपीडीसाठी इच्छुक रुग्णांनी ९३७०८१८२८२ या क्रमांकावर संपर्क साधून अपॉइंटमेंट घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















