गुहागर : शैलेश कांबळे याची NSDभारत रंग इंटरनॅशनल थिएटरमध्ये ऐतिहासिक झेप

banner 468x60

गुहागर तालुक्याचा सुपुत्र शैलेश कांबळे याने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालय (National School of Drama – NSD) आयोजित भारत रंग इंटरनॅशनल थिएटर ऑफ इंडिया या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यासपीठावर सादरीकरण करण्याची संधी मिळवत एक ऐतिहासिक झेप घेतली आहे. ही बाब संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह गुहागर तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

NSD च्या भारत रंग इंटरनॅशनल थिएटर फेस्टिव्हलचे आयोजन भारतातील दहा प्रमुख शहरांसह बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशांमध्ये करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय महोत्सवांतर्गत ४ फेब्रुवारी रोजी झारखंडमधील रांची येथे शैलेश कांबळे याला सादरीकरणाची संधी मिळाली.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची स्थापना १९५९ साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली असून, ही संस्था भारतातील नाट्य प्रशिक्षणाची सर्वोच्च आणि प्रतिष्ठित संस्था मानली जाते. सध्या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते परेश रावल हे NSD चे अध्यक्ष आहेत.

या संस्थेतून भारतातील अनेक दिग्गज कलाकार घडले असून, त्यामध्ये नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, अनुपम खेर, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल, राजपाल यादव, अनिल कपूर यांचा समावेश आहे. तसेच शाहरुख खान यांनीही NSD मधील दिग्गजांकडून अभिनय आणि वाक्प्रचाराचे धडे घेतले आहेत. अशा उच्च दर्जाच्या व्यासपीठावर सादरीकरण करण्याची संधी मिळणे ही कोणत्याही कलाकारासाठी मोठी गौरवास्पद बाब मानली जाते.

शैलेश कांबळे याने यापूर्वीही आपल्या कलेची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. २०२१ मध्ये महाराष्ट्राचा युवा कला गौरव पुरस्कार, तर २०२३ मध्ये राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात आले होते.
विशेष म्हणजे, गुहागर तालुक्यातून National School of Drama पर्यंत पोहोचणारा शैलेश कांबळे हा पहिलाच कलाकार ठरला असून, ही बाब स्थानिक कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे.
शैलेश कांबळे यांच्या पुढील कलात्मक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशामुळे गुहागरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *