गुहागर : ‘माझे पैसे कधी देणार’, विचारल्याच्यारागातून गुहागरमध्ये बिअरची बाटली फोडून मारहाण, स्वप्निल सुर्वेवर गुन्हा दाखल

banner 468x60

गुहागर तालुक्यातील तवसाळ गावामध्ये १ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पैशांच्या वादातून झालेल्या मारामारीत एकाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी आरोपी स्वप्निल विजय सुर्वे ( ४०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतीक गजानन मयेकर (३२) हे त्यांचे आंब्याच्या बागेच्या करारासंदर्भात आरोपी स्वप्निल विजय सुर्वे (वय अंदाजे ४०) यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेले होते. यावेळी प्रतीक मयेकर यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मावस भाऊ पुष्पराज हे देखील उपस्थित होते.


प्रतीक मयेकर यांनी स्वप्निल सुर्वे यांना “माझे पैसे परत दे, नाहीतर मी पोलीस केस करीन,” असे म्हटले. याचा राग आल्याने स्वप्निल सुर्वे घरात गेले आणि त्यांनी कोयती व लाकडी दांडका बाहेर आणला. प्रतीक मयेकर यांनी त्यांच्या हातातील कोयती हिसकावून घेतली. त्यानंतर स्वप्निल सुर्वे यांनी हातातील दांडक्याने प्रतीक मयेकर यांच्या डोक्यात मारले.


यावेळी प्रतीक मयेकर यांचे मावस भाऊ पुष्पराज त्यांना सोडवण्यासाठी पुढे आले असता, आरोपी स्वप्निल सुर्वे यांनी त्यांनाही लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले. घटनेवेळी प्रतीक मयेकर यांची पत्नी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण करत असताना, स्वप्निल सुर्वे यांनी बिअरची बाटली फोडून त्यांच्या अंगावर धावून येत मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. या घटनेमुळे तवसाळ गावामध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *