रत्नागिरी : कोकणनगरमध्ये ‘गांजा’ विक्री करणाऱ्याला अटक

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी रत्नागिरी जिल्ह्याला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (L.C.B.) रत्नागिरी शहरात धडक मोहीम राबवत कोकणनगर परिसरातून ‘गांजा’ या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस रंगेहाथ अटक केली.

banner 728x90


स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांचे एक पथक दिनांक ०८/१२/२०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. गस्तीदरम्यान, कोकणनगर कब्रास्थानजवळ असलेल्या मोकळ्या जागेत एक इसम हातात कॅरीबॅग घेऊन संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे पथकाला दिसले.


पोलिसांना पाहताच या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकाने त्वरित आणि योग्य बळाचा वापर करून दुपारी २.३० वाजता त्याला जागीच थांबवले. दोन पंचांसमक्ष त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव रईस सईद खान, वय ३२, रा. घर नंबर ३९०, मराठी शाळेसमोर, कोकण नगर, रत्नागिरी असे सांगितले.


पथकाने पंचांसमक्ष रईस सईद खान याची अंगझडती घेतली. झडतीमध्ये त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये काळपट हिरवट रंगाचा, पाने, फुले, बोंडे, काड्या व बिया असलेला, उग्र वासाचा एकूण २०४ ग्रॅम वजनाचा ‘गांजा’ सदृश्य अंमली पदार्थ असलेल्या १३ पारदर्शक प्लॅस्टिक पाऊच/पिशव्या मिळून आल्या. यासोबतच, त्याच्याकडे एक डिजीटल वजन काटा, दोन मोबाईल फोन आणि रोख ३,५०० रुपये असा एकूण ४९,७००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी रईस सईद खान याने हा ‘गांजा’ विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४५४/२०२५, एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे. रत्नागिरी पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू केलेल्या या कठोर मोहिमेमुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांवर वचक निर्माण झाला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह स.पो.नि. शबनम मुजावर (प्रभारी अधिकारी, महिला कक्ष), श्रेणी. पो.उनि. संदीप ओगले, पो.हवा. विजय आंबेकर, पो.हवा. योगेश नार्वेकर आणि पो.हवा. दीपराज पाटील या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *