वादळामध्ये भरकटलेल्या चार मासेमारी नौका व त्यावरील ३० मच्छिमार बांधव किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले आहेत. करंजा मच्छीमार सोसायटीच्या यामध्ये (चंद्राई व गावदेवी मरीन) २ बोटी ,गुहागर तालुक्यातील वेलदूर मच्छिमार सहकारी संस्थेची १ बोट (बाप्पा मोरया), दापोली तालुक्यातील कोळथरे सोसायटीची (साईचरण) बोट अशा एकूण चार बोटी मच्छीमारीसाठी खोल समुद्रामध्ये गेल्या होत्या. गेले
सहा दिवस अरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळामुळे बोटी भरकटलेल्या असल्याने बोटींचा संपर्क होत नव्हता, शुक्रवारी या बोटींशी संपर्क झाला चारही बोटी व बोटीवर काम करणारे एकूण ३० कामगार सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यादरम्यान नवानगर मच्छिमार सहकारी सोसायटी लि. या संस्थेच्या वतीने आमदार भास्कर जाधव यांना तात्काळ शासकीय सहकार्य मिळावेबाबत निवेदन देण्यात आले होते. आमदार भास्कर जाधव यांनी तात्काळ या निवेदनाची दखल घेऊन शासकीय यंत्रणेला तात्काळ शोध कार्याचे आदेश दिले व त्वरित शोध कार्य सुरू झाले.
अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या २ नौका बेपत्ता झाल्या होत्या त्यापैकी चंद्राई, गावदेवी मरीन तसेच, वेलदूर मच्छीमार सहकारी संस्था लि. यांची नौका बाप्पा मोरया व दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साई चरण अशा चार या नौकांसह सुमारे ३० ते ३५ मच्छीमार बांधव बेपत्ता झाले होते. सदर घटनेची माहिती करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्फत इंडियन कोस्ट गार्ड तसेच मत्स्य व्यवसाय विभाग यांना दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी ई-मेलद्वारे कळविण्यात आलली होती. बेपत्ता झालेल्या नौकांवरील सर्व कामगारवर्ग हा गुहागर तालुक्यातील असून गुहागर तालुक्यातील स्थानिक मच्छीमार कार्यकर्ते यांनी दि. २६ ऑक्टोबर ते दि. ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध मार्गांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.
तथापि, कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचे नवानगर मच्छीमार सहकारी सोसायटी यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच इंडियन कोस्ट गार्ड, मुंबई व मत्स्य व्यवसाय विभाग, मुंबई यांच्या शोधकार्यामध्येही दिरंगाई होत असल्याचे दिसून येत असल्याचेही दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, तात्काळ संबंधित शासकीय विभागांना आवश्यक त्या सूचना देऊन बेपत्ता नौका व मच्छीमार बांधव यांच्या शोधकार्याला गती द्यावी, तसेच सहकार्य व मदतकार्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, ही विनंतीही आमदार भास्कर जाधव यांना करण्यात आली होती. आमदार भास्कर जाधव यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित शासकीय यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. बेपत्ता झालेल्या चार नौका व ३० कामगार सुखरूप असल्याची माहिती प्राप्त होताच आनंद व्यक्त केला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













