दापोली : न्यायप्रविष्ट वक्फ जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, उटंबर येथील दर्गा देवस्थान प्रकरणी मकबूल दिनवारे यांची वनविभागाकडे तक्रार, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

banner 468x60

दापोली तालुक्यातील मौजे उटंबर येथील हजरत पीर बावा याकुब सर्वरी दर्गा देवस्थान यांच्या वक्फ वर्ग–२ जमिनीवर सागवान व फणसाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर अवैध तोड झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित जमीन न्यायप्रविष्ट असताना व दर्गा विश्वस्त मंडळाला कोणतीही पूर्वकल्पना न देता वृक्षतोड करण्यात आल्याने संतप्त झालेल्या विश्वस्तांनी दापोली वनविभागाकडे धाव घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

banner 728x90 banner 728x90

दर्ग्याचे सचिव जहूर हसनमियाँ झोंबडकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, उटंबर येथील सुमारे ६५३ एकर देवस्थान व वक्फ जमीन प्रकरण सध्या महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायालय येथे प्रलंबित आहे. या जमिनीतील सर्व्हे नं. १३०/१ च्या ७/१२ उताऱ्यावर “सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी” असा स्पष्ट शेरा नोंद असतानाही, १ फेब्रुवारी २०२५ रोजी केवळ एका व्यक्तीच्या नावे वृक्षतोडीची परवानगी देण्यात आल्याचा गंभीर आरोप विश्वस्त मंडळाने केला आहे.

दरम्यान, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी या जमिनीवर सागवान व फणसाची झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याचे दर्गा विश्वस्त फैयाज मुजावर व रहिमान मुजावर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन लाकूड भरत असलेल्या एका वाहनाला अडवून चौकशी केली असता, काही स्थानिक व्यक्तींच्या सांगण्यावरून ही वृक्षतोड केल्याचे संबंधितांनी सांगितले. मात्र, याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे किंवा विश्वस्तांची लेखी परवानगी सादर करण्यात आलेली नसल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच दर्ग्याचे अध्यक्ष मकबूल दिनवारे यांनी तातडीने दापोली वनविभागाशी संपर्क साधून घटनास्थळावरील छायाचित्रांसह लेखी तक्रार दाखल केली. इनाम व वक्फ स्वरूपाची ही जमीन वादग्रस्त व न्यायप्रविष्ट असताना, विश्वस्त मंडळाला विश्वासात न घेता वृक्षतोडीस परवानगी देणे हे नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचा ठाम दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणात तात्काळ पंचनामा करून झाडांची संख्या, प्रकार व झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करावा, तसेच परवानगी देणाऱ्या व प्रत्यक्ष तोड करणाऱ्या सर्व जबाबदार व्यक्तींवर वन कायदा व संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी विश्वस्तांनी केली आहे. याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही विश्वस्त मंडळाने दिला आहे.

उटंबर परिसरातील या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय संतुलनास धोका निर्माण झाला असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकरणात वनविभाग नेमकी काय भूमिका घेणार, तसेच दोषींवर कारवाई होणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे आणि पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *