चिपळुण : फी भरली नाही म्हणून सातवीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेची धमकी, “तुझ्या आई-वडिलांना चैन घालायला पैसे आहेत, फी भरण्यासाठी नाहीत”

Screenshot

banner 468x60

चिपळूण शहरातील एका नामांकित शाळेत सातवीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणामुळे पालकवर्गात प्रचंड संताप उसळला आहे.

विद्यार्थी गळ्यात चांदीची चैन घालून शाळेत आल्याचे पाहताच संबंधित शिक्षिका संतापल्या. हा राग मुलावरच काढत “तुझ्या आई-वडिलांना चैन घालायला पैसे आहेत, फी भरण्यासाठी नाहीत!” अशी अवमानकारक भाषा विद्यार्थ्याला ऐकवली, असा पालकांचा गंभीर आरोप आहे. याच शिक्षिकेने विद्यार्थ्याला आणखीही अपमानजनक बोल सुनावल्याने हा चिमुकला मानसिक धक्क्यात गेला आहे.

banner 728x90

तर मुलाने पालकांना असं सांगितलं की सततच्या धमक्यांमुळे त्याने आता शाळेत जाण्यासच नकार दिला असून घरच्यांना तो भीती व्यक्त करत आहे.
प्रकरण वाढल्यावर विद्यार्थ्याची आई थेट शाळेत पोहोचली आणि मुख्याध्यापकांना स्पष्टीकरण विचारले. मात्र, आईसमोरच शिक्षिकेने “याला मी सोडणार नाही” अशी थेट धमकी पुन्हा दिल्याचा दावा पालकांनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर आईने चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला.

तक्रारीची दखल घेत चिपळूण पोलिसांनी तात्काळ NCR दाखल करून कलम 351(2) अन्वये तपास सुरू केला आहे. घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट असून, “मुलाला दिलेल्या मानसिक त्रासाची शिक्षा मिळायलाच हवी” अशी तीव्र प्रतिक्रिया येत आहे. सध्या विद्यार्थी भीतीमुळे शाळेत जात नसल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
पोलिस तपास सुरू असून पुढील काही तासांत संबंधित शिक्षिकेचे जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *