देवरुख पोलिसांनी शिकारीच्या उद्देशाने बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. संगमेश्वर तालुक्यातील पांगरी-घोडवली सीमेवर बुधवारी पहाटे गस्त घालत असताना पोलिसांनी दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनापरवाना बंदूक आणि ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक बुधवारी पहाटे परिसरात गस्त घालत होते. यावेळी सचिन कामेरकर, सचिन पवार आणि अभिषेक वेळवणकर यांना पांगरी- घोडवलीच्या सीमेवर एका मोटारसायकलवरून दोन तरुण संशयास्पद रित्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडे विनापरवाना बंदूक सापडली. वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने हे दोघे फिरत असल्याची कबुली तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सूरज आगरे (रा. आग्रेवाडी, तुळसणी) आणि संदीप कातकर (रा. कातकरवाडी, तुळसणी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून एक बंदूक, ७ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
या धडाकेबाज कारवाईबद्दल पोलीस विभागीय अधिकारी सुरेश कदम यांनी देवरुख पोलिसांचे कौतुक केले आहे. ही विनापरवाना बंदूक आरोपींकडे कुठून आली आणि यामध्ये आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











