दापोली : थार अपघात आणि कार रेसनंतर दापोली पोलीस करणार कारवाई, समुद्रकिनारी पोलिसांकडून बॅरिकेटिंग

banner 468x60

दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी थार गाडी पलटी झाल्याची घटना ताजी असतानाही हर्णे समुद्रकिनारी पर्यटकांकडून गाड्या घेऊन स्टंटबाजी करण्याचे प्रकार सुरूच आहेत.


या प्रकारामुळे पोलीस प्रशासन सजग झाले आहे. दापोली पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे.

काही पर्यटकांनी आपल्या गाड्या थेट पुळणीवर नेऊन धोकादायक कसरती केल्या. या प्रकारामुळे अपघातांचा धोका वाढत असून, स्थानिक नागरिकांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.


       
    दरम्यान, कर्दे येथील थार गाडी अपघातानंतर विकेंडच्या काळात संपूर्ण किनारपट्टीवर पोलिसांची गस्त वाढविण्यात येईल. स्टंटबाजी करताना कोणीही आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच स्थानिक प्रशासनाने समुद्रकिनारी पर्यटकांना वाहने नेण्यास अटकाव करणे गरजेचे आहे; तरच अशा घटना रोखता येतील, असे दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश तोरस्कर यांनी सांगितले.
      

समुद्रावर गाड्या नेऊन स्टंटबाजी करणे, पाण्यात पोहण्याचा अतिरेक करणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नुकतीच कर्दे येथे थार गाडी पलटी होऊन गंभीर अपघात टळला होता. त्यामुळे ग्रामपंचायत, ग्रामसुरक्षा दल, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *