दापोली तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहित, विकास आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिले जाणारे 2026 चे पत्रकारिता पुरस्कार निवड समितीने जाहीर केले आहेत.
या पुरस्कारांचे वितरण येत्या 6 जानेवारी रोजी रामराजे महाविद्यालय, दापोली येथे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावर्षीचा सातत्यपूर्ण कामगिरी पुरस्कार कोकण कट्टा न्यूज चॅनल तसेच निवेदिता फास्ट न्यूजचे पत्रकार सलीम रखांगे यांना जाहीर करण्यात आला आहे.

पत्रकार सलीम रखांगे
दापोली तालुक्यातील विविध स्थानिक प्रश्न, नागरी समस्या आणि सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

पत्रकार राधेश लिंगायत
विकासात्मक बातमी पुरस्कार दैनिक सकाळचे दापोली प्रतिनिधी राधेश लिंगायत यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी दापोली तालुक्यातील पर्यटन विकास, मच्छीमारांच्या समस्या तसेच स्थानिक विकासाशी संबंधित विषयांवर सातत्यपूर्ण व अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.
पत्रकारितेसोबत सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेले दिव्य कोकणचे संपादक अजित सुर्वे यांना सामाजिक बांधिलकी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दिव्य कोकणचे संपादक अजित सुर्वे
तर दैनिक सागरचे माटवण वार्ताहर अजित मोरे यांना वैशिष्ट्यपूर्ण पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

पत्रकार अजित मोरे
तसेच कोकण कट्टा न्यूजचे संपादक, युट्युब वाहिनी संपूर्ण कोकणासह परदेशातही लोकप्रिय करून पत्रकारितेचा वेगळा ठसा उमटविणारे दाभोळ गावचे सुपुत्र तेजस बोरघरे यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे, पुढारी न्यूज वृत्तनिवेदक
दापोलीतील रामराजे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर आपले कोकण या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पत्रकारितेच्या क्षेत्रात पदार्पण करून पुणे व मुंबई येथे विविध वृत्तपत्रांमध्ये कार्यरत असलेले सिद्धेश शिगवण यांना युवा पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पत्रकार सिद्धेश शिगवण
याबाबत निवड समितीचे अध्यक्ष जगदीश वामकर यांनी माहिती दिली. निवड समितीत प्रसाद रानडे, प्रशांत परांजपे, प्रशांत कांबळे आणि रूपेश वाईकर यांचा समावेश होता.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास रामराजे महाविद्यालयाचे संस्थापक संदीप राजपुरे, दापोली नगराध्यक्षा कृपा घाग, जालगावचे सरपंच उद्योजक अक्षय फाटक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका साधना बोत्रे, दशानामे गुजर युवक संघटना आणि जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर यांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















