दापोली : सुरीने गळा चिरून सुनेचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप

banner 468x60

घरगुती कारणावरून मनात राग धरून पोटच्या सुनेचा धारदार सुरीने गळा चिरून खून करणाऱ्या नराधम सासऱ्याला खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मधुकर धोंडू सणस (वय ६२, रा. टाळसुरे-आष्टीवाडी, दापोली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

banner 728x90

ही धक्कादायक घटना २९ मार्च २०२२ रोजी घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेसह ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मधुकर सणस हा सून आरती अभिषेक सणस हिच्यावर घरगुती कारणावरून वारंवार चिडून होता. विशेष म्हणजे, कोरोना काळात आरती यांनी आशा सेविका म्हणून बजावलेल्या कर्तव्याचाही त्याला राग होता. याच रागातून २९ मार्च २०२२ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आरोपीने सुरीला धार लावून आरती यांच्यावर पाठीमागून वार केले व त्यांचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. या थरारक घटनेनंतर आरोपीने स्वतःदेखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.


या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांच्यासमोर झाली. सरकारी वकील ॲड. मृणाल जाडकर यांनी मांडलेला युक्तीवाद आणि सादर केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल आणि घटनास्थळी मिळालेले परिस्थितीजन्य पुरावे या गुन्ह्यात महत्त्वाचे ठरले. या निकालाने परिसरात खळबळ उडाली असून, कायद्याचा वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *