दापोली : रात्री लागलेल्या आगीत घर जळून खाक, लाखोंचं नुकसान

banner 468x60

दापोली तालुक्यातील टेटवली-मळेकरवाडी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत घर भस्मसात झाले.

मात्र आदल्या दिवशी सायंकाळी घरात साप शिरल्याने सापाच्या भितीने घरातील सहाजण अन्यत्र झोपण्यासाठी गेल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या आगीत घरातील सर्व साहित्य जळून गेले असून साडेसहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टेटवली-मळेकरवाडी येथे देवू भडवळकर यांचे घर आहे. भडवळकर यांनी नवीन घर बांधल्यामुळे ते पूर्वीच नवीन घरात रहायला गेले आहेत. मात्र जुन्या घराची साफसफाई व्हायला पाहिजे व राबता राहण्याकरिता त्यांनी विजय नवरत व रुपेश जगदाळे यांना घर राहण्याकरिता दिले.

विजय नवरत यांची पत्नी व दोन मुले तसेच रुपेश जगदाळे व यांची पत्नी असे सहाजण या घरात रहात होते. गुरुवारी सायंकाळी अंधार पडण्याच्या सुमारास भडवळकर यांच्या घरामध्ये एक मोठा साप शिरला. साप शिरल्यावर घरातील मंडळी घाबरून गेली. सापाचा शोधाशोध करूनही साप काही सापडला नाही.

अखेर रात्री झोपल्यानंतर झोपेमध्ये साप दंश करू नये याकरिता विजय नवरत त्यांची पत्नी व दोन मुले शेजारीच असणाऱ्या सासूरवाडीत रहायला गेले. तसेच रुपेश जगदाळे हे बाजूलाच असणाऱ्या मेहुण्यांकडे रहायला गेले. यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून या घरात कोणीही नव्हते. मात्र शुक्रवारी मध्यरात्री या घराला अचानक आग लागली.

घरात कोणीही नसल्यामुळे आग लागल्यावर कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठा आगडोंब उसळला. घराचे वासे पेटले. वासे पेटल्यानंतर कौले पडू लागल्यावर मोठा आवाज होऊ लागल्याने शेजारी जागे झाले व पहाटे 3 वाजता आग आटोक्यात आणण्यासाठी धावाधाव सुरू झाली. मळेकरवाडीतील सर्वांनी आपापल्या घरातील भांड्यानी पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

तोपर्यंत या आगीमध्ये विजय नवरत व रुपेश जगदाळे यांचे सर्व गृहपयोगी साहित्याचे जळून खाक झाले होते. शिवाय घर जळून सुमारे साडेसहा लाखाचे नुकसान झालेले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *