दापोली रॅगिंग प्रकरण : दापोली कोकण कृषी महाविद्यालयाचा खुलासा

banner 468x60

दापोलीमध्ये चर्चेत असलेल्या रॅगिंग प्रकरणात दापोली कोकण कृषी महाविद्यालयालाने खुलासा केला आहे.

कोकण कृषी महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये सत्र ७ मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्याचा शारीरीक आणि मानसिक छळ होत

असल्याबाबत दि. ३१/७/२०२४ रोजी कुलसचिव यांच्या मार्फत सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, दापोली यांना अर्ज सादर केला आहे. त्याची प्रत पोलीस निरीक्षक, दापोली पोलीस ठाणे यांना सादर केली आहे, अशी माहिती कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे दिली आहे.

तक्रारदार आणि इतर १० विद्यार्थी माणगाव, कोशींबळे, रोहा या केंद्रावर रावे कार्यक्रमा अंतर्गत सत्र ७ मधील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाठविण्यात आलेले आहेत. तक्रारदार विद्यार्थ्यांनी त्याच्याच वर्गातील तीन विद्यार्थ्यांवर शारीरीक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार केली आहे.सदरचा प्रकार कोशींबळे, ता. माणगाव, जिल्हा रायगड येथे घडला आहे.

प्रस्तुत प्रकरणी तातडीने महाविद्यालय स्तरावर प्राथमिक चौकशी करण्यात आली असुन शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गैरअर्जदार तीनही विद्यार्थ्यांची तातडीने दुरवरच्या ठिकाणी बदल्या करण्यात आलेल्या आहेत, असंही पत्रकामध्ये म्हटलं आहे.अर्जदार यांनी केलेले आरोप हे गंभीर स्वरुपाचे असल्याने सर्वंकष चौकशी करण्याचं काम प्रगतीपथावर आहे.

त्याच प्रमाणे सदर बाब रॅगींग अंतर्गत येते किंवा कसे याबाबत चौकशीअंती निश्चिती होणार आहे. मात्र असे असताना सुध्दा काही वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे यामध्ये महाविद्यालयामध्ये रॅगींगची घटना घडलेली आहे अशा स्वरुपाच्या बातम्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. यामुळे कृषी महाविद्यालयाचे तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांची बदनामी होत आहे.

कृषी महाविद्यालय, दापोली हे कोकणातील एकमेव नामांकीत दर्जेदार कृषी शिक्षण देणारे शासकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्राधान्याने आणि नियमीतपणे ओढा असतो असं पत्रकात म्हटलं आहे. गेल्या ५९ वर्षामध्ये या महाविद्यालयामध्ये अशा गंभीर स्वरुपाच्या घटना घडलेल्या नाहीत.

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडून नियमीतपणे शिस्तीचे पालन केले जाते. आजपर्यंत अशा प्रकारचे कोणतेही गैरवर्तन विद्यार्थ्यांकडून घडलेले नाही. याच विद्यापीठातुन ६९ विद्यार्थी गेल्या वर्षात “आंतरराष्ट्रीय शिक्षण पध्दती आणि शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान” प्रशिक्षणासाठी परदेशी विद्यापीठात पाठविण्यात आले होते. तसेच गेली अनेक वर्षे या

महाविद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धा परिक्षा मध्ये यशस्वी होत आहेत. गेली अनेक वर्षे आणि सद्यस्थितीत सुध्दा या महाविद्यालयामध्ये देशातील अनेक राज्यातुन विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत.

आणि हे विद्यार्थी त्यांचा शिक्षणक्रम शिस्तीने, शांततेने, कोणताही त्रास न होता आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे / पूर्ण करीत आहेत.या महाविद्यालयाची उच्च शैक्षणिक परंपरा लक्षात घेता, पुरेशी माहीती न घेता आणि ज्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नाही

त्याबाबत टोकाचे निष्कर्ष अगोदरच प्रसिध्द करणे ही बाब उचित नाही. सदर प्रकरणात आवश्यकता भासल्यास पुढील कारवाईसाठी माणगाव पोलीस ठाणे, जिल्हा रायगड यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे, अशी‌ माहितीही सहयोगी अधिष्ठाता यांनी दिली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *