चिपळूण येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर २५ मार्च रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा दापोली तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या घटनेमुळे पत्रकारितेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कर्तव्य बजावत असलेल्या पत्रकारावर हल्ला होणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत हे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या उपोषणासंदर्भातील वृत्तांकनासाठी २५ मार्च रोजी बहादूर शेख नाका, चिपळूण येथे गेले असता, तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून, “पत्रकारांची सुरक्षा धोक्यात आली आहे का?” असा सवालही यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे. समाजातील प्रश्न, अन्याय आणि घडामोडी लोकांसमोर आणणाऱ्या पत्रकारांवरच अशा प्रकारे हल्ले होणे हे अत्यंत निषेधार्ह असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या घटनेच्या निषेधार्थ दापोलीतील पत्रकारांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक, रत्नागिरी यांना लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
“हल्लेखोरांना त्वरित अटक करून कायद्याचा धाक दाखवला नाही, तर अशा घटना वाढण्याची भीती आहे,” असा इशाराही पत्रकारांनी दिला आहे.
निवेदनावर दापोलीतील पत्रकार मनोज पवार, शैलेंद्र केळकर, महेश महाडिक, प्रसाद रानडे, आनंद करमरकर, राधेश लिंगायत, बाळासाहेब नकाते, सलीम रखांगे, डॉ. प्रशांत परांजपे, प्रशांत कांबळे, जगदीश वामकर, समशाद खान, रुपेश वाईकर, ज्योती बिवलकर आदींच्या सह्या आहेत.
पत्रकारांवरील वाढते हल्ले ही अत्यंत चिंतेची बाब असून, प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
एकूणच, चिपळूण येथील या घटनेमुळे दापोलीसह संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींना तात्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













