दाभोळ पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या लोकमान्य टिळक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आणि हजारो विद्यार्थ्यांचे आदरणीय मार्गदर्शक मेघश्याम शेलार सर यांच्या निधनाची अत्यंत दुःखद वार्ता समोर आली आहे.

आज १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २:४५ वाजता पुण्यातील राहत्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण दाभोळ पंचक्रोशीतील शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शेलार सरांनी विज्ञान व गणित विषयांचे कुशल अध्यापन करत आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर पर्यवेक्षक ते मुख्याध्यापक असा तब्बल ३२ वर्षांचा यशस्वी प्रवास लोकमान्य टिळक विद्यालयात पूर्ण केला. त्यांच्या नेतृत्वात विद्यालयाला शिस्त, गुणवत्ता आणि शैक्षणिक उंचीचा नवा आयाम लाभला.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी दापोलीजवळील मौजे उंबरले येथील स्वतःच्या फार्महाऊसवर शेलार मॅडम यांच्यासोबत निवांत व शांत आयुष्याचा आनंद लुटला. तरीदेखील त्यांचा शैक्षणिक आणि बौद्धिक प्रवास सतत सुरूच राहिला.
शैक्षणिक तसेच सामाजिक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे शेलार सर हे वेद, उपनिषदे आणि श्रीमद भगवद्गीता यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे विद्वान मार्गदर्शक होते. सोशल मीडियावरही त्यांनी सातत्याने मौलिक लेखन करत जनमानसात एक विद्वान, संतुलित आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ठसा उमटवला.
दोन वर्षांपूर्वी शेलार सरांनी ‘सामान्यांतील असामान्य’ हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. प्रतिकूल परिस्थितीतून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा हा अनोखा उपक्रम होता.
त्यात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या वाटचालीचा गौरवपूर्ण परिचय केला, ज्यात—
- रत्नागिरीतील गोदा जांभवडेकर विद्यालयाच्या उपशिक्षिका नेहल संतोष पावरी (पूर्वाश्रमीची गीता शिरगावकर)
- मुंबई–कुलाबा येथील पोलीस अधीक्षक (P.S.I., उत्तर मुंबई) विज्ञान दाभोळकर
अशा अनेक विद्यार्थ्यांच्या यशोगाथांचा समावेश होता.
शेलार सरांच्या जाण्याने दाभोळ पंचक्रोशीने एक कर्तृत्ववान, विद्वान आणि संवेदनशील शिक्षक गमावला आहे. त्यांच्या विचारांची, कार्याची आणि मूल्यांची परंपरा विद्यार्थ्यांच्या रूपाने पुढे चालत राहील, हेच त्यांच्या अजरामर योगदानाला योग्य अभिवादन ठरेल.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















