दाभोळ : निस्वार्थ सेवा आणि मानवतेचा उज्वल दीपस्तंभ – डॉ. एम. बी. लुकतुके यांचा 90 वा वाढदिवस साजरा

banner 468x60

दाभोळ येथील बोगन व्हिला (वणौशी) येथे शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. एम. बी. लुकतुके (MBBS) यांचा ९० वा वाढदिवस उत्साहात आणि साध्या पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला.

निस्वार्थी सेवेसाठी आणि आदर्श वैद्यकीय कार्यासाठी परिचित असलेल्या डॉ. लुकतुके यांना दाभोळ, दापोलीसह पंचक्रोशीतील समाजाची मनःपूर्वक अभिवादनं व शुभेच्छा देण्यात आल्या.


डॉ. लुकतुके यांचा वैद्यकीय प्रवास १९६० मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावातून सुरू झाला. आरोग्य तपासणीसाठी तंत्रज्ञानाची कमतरता असतानाही त्यांनी रुग्णांची अचूक चिकित्सा करत, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांतून जखमी रुग्णांपासून गंभीर दुर्घटनांपर्यंत सगळी प्रकरणे यशस्वीपणे हाताळली. “बिन खुर्चीचे डॉक्टर” म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. लुकतुके, डोंगर-टेकडी पायी चढून आणि छोट्या होडीने खाडीपलीकडे जाऊनही रुग्णसेवा केली .


६५ वर्षे अखंड सेवा दिल्यानंतर मार्च २०२५ मध्ये त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेला विश्रांती दिली. परंतु अद्यापही वाचन व ज्ञानार्जन यामध्ये ते सक्रिय आहेत. त्यांच्या परोपकारी वृत्तीमुळे अनेक गरिब रुग्णांवर मोफत उपचार केले गेले असून, पंचक्रोशीतील नागरिक त्यांना आदर्श मानून सन्मानाने पाहतात.


वाढदिवसाच्या कार्यक्रमात पुण्यातून त्यांच्या पुत्र केदार लुकतुके, रूपा लुकतुके, वैशाली पंडित, सदाशिव पंडित आणि अनेक स्नेही उपस्थित होते. तसेच दापोलीतील प्रतिष्ठित डॉक्टर्स डॉ. जोशी, डॉ. पटवर्धन, डॉ. भाटकर, डॉ. तलाठी व पंचक्रोशीतील चंद्रकांत वैशंपायन, गुलजार खतीब, विलास जोशी, सुभाष वैद्य, सुषमा रेडीज, शब्बीर दरवेश, किशोर तांबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मंगेश तांबट, दादू मुरमुरे, राजेश पारेख, प्रमोद परांजपे, सुदेश कुलापकर आणि अभय ढोर्लेकर यांनी केले. उपस्थित सर्वांनी डॉ. लुकतुके यांना शुभेच्छा दिल्या.


डॉ. एम. बी. लुकतुके हे आजही समाजसेवेसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत, आणि त्यांचा आत्मदान व निस्वार्थ सेवा भाव सर्वांमध्ये उजळून राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *