दाभोळ : नाष्टा करताना वाद, महिलेला पातेल्याने आणि काठीने मारहाण, गुन्हा दाखल

banner 468x60

किरकोळ वादातून आणि जेवण वेगळे बनवण्याच्या कारणावरून दापोली तालुक्यातील आंग्रेवाडी, सातेरे येथे एका ३५ वर्षीय महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. नाष्टा करत असताना झालेल्या या वादात संतापलेल्या एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या हातावर जेवणाचे ॲल्युमिनियमचे पातेले आणि पायावर जंगली लाकडी काठीने जोरदार प्रहार करत दुखापत केली.

banner 728x90

याप्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास दापोली तालुक्यातील आंग्रेवाडी, सातेरे तर्फे हवेली येथे घडली. फिर्यादी श्रीदेवी जनार्दन चोगले (वय ३५) या आपल्या राहत्या घरी सकाळी नाष्टा करत होत्या. त्यावेळी आरोपी सुवर्णा सुरेश चोगले (रा. आंग्रेवाडी) तिथे आल्या आणि त्यांनी कोणतेही कारण नसताना वाद घालण्यास सुरुवात केली.

सुवर्णा चोगले यांनी फिर्यादी श्रीदेवी यांना शिवीगाळ करत, “तू वेगळे जेवण बनवून खातेस, तर माझ्या घरात खायचे नाही. माझ्या घरातून निघून जा,” असे धमकावले. यावर श्रीदेवी यांनी, “जे तुम्ही करता, तेच मी करीत आहे,” असे उत्तर दिले. या उत्तराचा राग आल्याने सुवर्णा चोगले यांनी हातातील जेवण बनवण्याचे ॲल्युमिनियमचे पातेले श्रीदेवी यांच्या उजव्या हातावर मारले. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी पडवीत असलेली जंगली लाकडी काठी उचलून श्रीदेवी यांच्या उजव्या पायाच्या पोटरीवर सपासप वार केले.

या मारहाणीत श्रीदेवी यांच्या पायाला सूज आली असून त्यांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी जखमी श्रीदेवी जनार्दन चोगले यांनी दाभोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुवर्णा सुरेश चोगले यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ (BNS) चे कलम ११८(१) (धोकादायक शस्त्राने किंवा साधनाने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) आणि ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास दाभोळ पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *