चिपळूण : लग्नाच्या आनंदावर दुःखाचा आघात, लेकीच्या विवाहाच्या तयारीत असतानाच पित्याचे आकस्मिक निधन

banner 468x60

लेकीचे लग्न ही कुठल्याही पित्यासाठी आयुष्यातील अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची घटना असते. मात्र हा आनंद साजरा होण्याआधीच काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना चिपळूण शहरात घडली आहे. येत्या १० मे रोजी मुलीच्या विवाहासाठी घरात आनंदाचे वातावरण असताना, अवघ्या चार दिवसांपूर्वीच लग्न ठरलेल्या गौतम सीताराम जाधव (वय ६०) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले.

banner 728x90


गौतम जाधव हे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर, हॉटेल आरंभशेजारी गेल्या अनेक वर्षांपासून फळविक्रीचा व्यवसाय करीत होते. अत्यंत प्रामाणिकपणे आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्यांच्या कष्टातून त्यांनी आपल्या तीनही मुलींना उच्च शिक्षण दिले. तिन्ही मुली पदवीधर असून, मोठ्या मुलीने फार्मसीची पदवी संपादन केली आहे. तिने नवी मुंबई येथे स्वतःचे मेडिकल सुरू करून स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे.


चारच दिवसांपूर्वी गौतम जाधव यांच्या दुसऱ्या मुलीचे लग्न निश्चित झाले होते. विवाहाची तारीख १० मे ठरली होती. घरात लग्नाच्या तयारीची लगबग, स्वप्नांची उधळण आणि आनंदाचे वातावरण नांदत असतानाच त्यांचे अचानक जाणे कुटुंबासाठी मोठा धक्का देणारे ठरले आहे. ‘मुलीचे लग्न आपल्या डोळ्यांनी पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले,’ अशी हळहळ सर्वत्र व्यक्त केली जात आहे.


गौतम जाधव हे चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्रमांक १ चे सभासद होते. तसेच ते दिवंगत पत्रकार उत्तमकुमार जाधव, हर्षवर्धन गायन पार्टीचे गायक दिवंगत अनंत जाधव आणि चिपळूण नगर परिषद कर्मचारी प्रीतम जाधव यांचे बंधू होत. हॉटेल आरंभचे मालक हेमंत अनंत जाधव यांचे ते चुलते होते.


त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि प्रामाणिक व्यवहारामुळे परिसरातील व्यापारी, ग्राहक आणि परिचितांमध्ये त्यांचा मोठा स्नेह होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने केवळ जाधव कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. आनंदाच्या उंबरठ्यावर उभे असलेले घर एका क्षणात शोकसागरात बुडाले असून, जाधव कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखावर सर्व स्तरांतून संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *