नाशिकच्या खैर तस्करीची पाळेमुळे चिपळूणच्या सावर्डेपर्यंत पसरल्याचे मंगळवारी समोर आले आहे. नाशिकच्या खैर तस्करीचा तपास करताना चिपळूणचे धागेदोरे मिळाल्याने मंगळवारी नाशिक वनविभागाच्या पथकाने सावर्डे परिसरात कात तयार करणाऱ्या 3 फॅक्टरीवर धाड टाकली.
या धाडीत फॅक्टरीमध्ये मोठया प्रमाणात अवैध खैरसाठा केल्याचे निदर्शनास आल्याने एका फॅक्टरीचे गोडावून सील करण्यात आले आहे, तर दुसऱ्या फॅक्टरीला नोटीस बजावण्यात येणार आहे.
नाशिकच्या खैर तस्करी प्रकरणांमध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील 2 आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी असून उर्वरित दोन आरोपी हे गुजरातचे रहिवासी आहेत.
काही दिवसांपूर्वीच खैर तस्करीचे धागेदोरे दहशतवादाशी जोडले गेल्यामुळे दहशतवाद विरोधी पथकाने सावर्डे, दहिवली येथे कारवाई करत मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करुन 6 आरोपींना अटक केली होती. यातील एक आरोपी संगमनेर आणि इतर दोन आरोपी नाशिक येथील असल्यामुळे नाशिक वनपथकाने आपला मोर्चा पुन्हा चिपळूणमध्ये वळवल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करताना त्यातील सहभागी आरोपांनी चौकशीत नाशिकमध्ये बेकायदा पद्धतीने तोडलेले खैर हे सावर्डे येथील फॅक्टरीमध्ये पाठवत असल्याचे सांगितले. त्यामुळेनाशिकचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनानुसार 16 वनकर्मचाऱ्याच्या पथकाने मंगळवारी सकाळी सावर्डे येथील सिंडिकेट फुड्स कुंभारवाडा फॅक्टरीवर धाड टाकली.
या धाडीत फॅक्टरीमध्ये मोठया प्रमाणात अवैध खैरसाठा केल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने वनविभागाने चौकशी केली असता या फॅक्टरीचे मालक विक्रांत तेटांबे हे फरार असल्याचे आढळले. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यानी समन्स जारी केला असून फॅक्टरीमधील कागदपत्रे, पुस्तके, वाहतूक पासेस, टॅबलेट इत्यादी बाबी पुढील चौकशीसाठी जप्त केल्या आहेत. तसेच या फॅक्टरीमध्ये मोठया प्रमाणात कात ज्यूस व रेडिमेड कात आढळला आहे.
हा कात नाशिकच्या जंगलातील खैर लाकडाची अवैध तोड करून अवैध वाहतूक करून बनवण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने फॅक्टरीला सील ठोकले आहे. दरम्यान, नाशिक वनविभागाच्या पथकाने नंतर सावर्डे व दहिवली येथील फॅक्टरीमध्ये धाड टाकली. परंतु फॅक्टरीचे मालक हे अनुपस्थित असल्याने पुढील चौकशी करता आली नाही. तिथे उपस्थित कर्मचाऱ्यानी नाशिक वनविभागाला चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही.
त्यामुळे आता त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे असल्याचे विशाल माळी यांनी सांगितले. ही कारवाई नाशिकचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन आणि कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक मणिकंदन रामानुजन यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारी, वनपरिक्षेत्र वनाधिकारी सविता पाटील व कर्मचार्यांनी केली.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*