चिपळूण कराड महामार्ग 60 दिवस बंद; वाहतूक बदल पाहा पाटण शहरातील रस्ता पर्यायी मार्ग जाहीर

banner 468x60

चिपळूण : कराड–चिपळूण राष्ट्रीय महामार्ग (NH 166E) वरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण शहरामधील धांडे पुलाचे पुनर्बांधणी काम तसेच बाजारपेठेतील रस्त्याचे काँक्रीटीकरण हाती घेण्यात आल्यामुळे पाटण शहरातील मुख्य रस्ता पुढील ६० दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

banner 728x90

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याबाबतची अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून, ही वाहतूक व्यवस्था २७ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ००:०१ पासून लागू होणार आहे आणि २७ मे २०२६ रोजी रात्री २३:५९ पर्यंत कायम राहणार आहे.

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

चिपळूणकडून कराड, उंब्रज किंवा पुढे पुण्याकडे जाणाऱ्या ट्रक, बससारख्या अवजड वाहनांना पाटणमार्गे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांना आता संगमेश्वर – आंबा घाट – मलकापूर – कोकरूड – उंडाळे – पाचवड फाटा या मार्गे राष्ट्रीय महामार्ग ४ (NH 4) वरून पुढे वळवण्यात येणार आहे.

हलक्या वाहनांसाठी मार्ग

कार, जीप आणि दुचाकींसारख्या हलक्या वाहनांसाठी नेरळे – गौंड – गव्हाणवाडी फाटा – नवारस्ता या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मार्गाने कराड आणि उंब्रजकडे वाहतूक सुरू राहणार आहे.

कारण आणि प्रशासनाची तयारी

पाटण शहरातील धांडे पुलाचे पुनर्बांधणी आणि बाजारपेठेतील रस्ता काँक्रीटीकरण ही दोन्ही कामे एकाच वेळी सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक वळवण्यात आलेल्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांना आवाहन

या कालावधीत चिपळूण, कराड, सातारा आणि पुण्याकडे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाचे योग्य नियोजन करावे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे.

या बदलामुळे प्रवासाचा वेळ काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी संयम बाळगून सुरक्षित प्रवास करावा, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *